पुणे- पुण्यातील गुलटेकडी परिसरात दोन महिलांमध्ये तुफान राडा झाला. तोंडाकडे पाहून थुंकल्याच्या कारणावरून दोन महिलांमध्ये झालेल्या हाणामारीत एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात विट मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोन जणांना अटक केली आहे.
प्रियंका चंद्रकांत पवार ( वय -24 रा . मीनाताई ठाकरे वसाहत , गुलटेकडी ) असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अरुणा लक्ष्मण चव्हाण, आदित्य लक्ष्मण चव्हाण ( वय 19 ) , ओम लक्ष्मण चव्हाण ( तिघे रा . औद्योगिक वसाहत , गुलटेकडी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी अरुणा आणि आदित्य चव्हाण यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत बुधवारी ( दि . 30 ) रात्री आठच्या सुमारास घडला. आरोपी आणि फिर्यादी हे एकाच गल्लीत राहतात . अरुणा चव्हाण ही महिला फिर्यादी प्रियंका पवार यांच्याकडे पाहून थुंकली. या कारणावरून फिर्यादी यांनी अरुणा चव्हाण या महिलेला शिवीगाळ केली. याचा राग मनात धरुन आरोपी अरुणा हिने इतर आरोपींना फोन करून बोलावून घेतले. आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसुन हाताला धरुन बाहेर ओढत आणले. आरोपींनी फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तर अरुणा यांनी फिर्यादीच्या डोक्यात वीट मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे करीत आहेत.