पिंपरी- भाई म्हटलं नाही म्हणून गावगुंडांच्या टोळक्याने एका तरुणाला कुत्र्यासारखी बिस्कीट खायला लावून बेदम मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना थेरगाव परिसरामध्ये मंगळवारी (ता. २५ ) रात्री साडेदहा वाजता घडली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहन वाघमारे या सराईत गुन्हेगारासह प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश राजेंद्र दबडे या २० वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता. घटनेच्या वेळी आरोपी रोहनने पीडित तरुणाला भेटायला बोलावले. पीडित तरुण भेटायला गेल्यानंतर आरोपीने तरूणाने रोहनला तू मला फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने ‘तू मला रोहन का म्हणालास, मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे’, असे म्हणत रोहनने तरूणाला शिवीगाळ केली. तसेच कुत्रे खातात त्या पद्धतीने बिस्किटे खाण्यास भाग पाडत, कमरेच्या बेल्टने व लाथाबुक्यांनी अमानुष पद्धतीने मारहाण केली.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात गुन्ह्याचा आलेख वाढत चालला असून खून, मारामाऱ्या, अशा गंभीर घटनांची वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे.