DEVENDRA FADANVIS

सामूहिक राष्ट्रगीत उपक्रम : चला सारेजण राष्ट्रगीत गाऊ या ; एक अनोखा विक्रम करू या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

319 0

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ मिनिटे या कालावधीत नियोजित ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात’ सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम निर्माण करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत.

राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे, असे श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान – थोर, स्त्री – पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!