पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे सोमवारी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजल्यानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मदनदास देवी यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी पुण्यातील मोतीबाग या संघाच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. मोतीबागमध्ये अंत्यदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सर कार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सह सरकार्यवाह सुरेश सोहनी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, हे पुण्यात दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे प्रथमच पुण्यात येत आहेत. ते आज मुंबईहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुण्यात दाखल झाले असून त्यांनी पुणे विमानतळ येथून थेट पुण्याचे राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे मुख्यालय असणाऱ्या मोतीबाग येथे येऊन मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.