पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली.
पुण्यातील कात्रज चौक येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहरातील आमदार व भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर असून राज्याचे आर्थिक इंजिन आहे. मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेत सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आला. त्यामुळे टीका करणाऱ्या विरोधकांनी वस्तुस्थिती तपासावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने पुण्यासाठी भरीव विकास आराखडा तयार केला आहे.
पुणे मेट्रोचे ११० किमी मार्ग नियोजित असून त्यातील ३१ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर २४ किमी मार्ग अंतिम टप्प्यात आहे. २४/७ पाणीपुरवठा योजनेचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून सांडपाणी प्रक्रिया व ८८ किमी नदी सुधार प्रकल्पामुळे पूरनियंत्रण व पर्यावरण संरक्षण होणार आहे. शहरासाठी ४४ हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, रिंग रोड, ५४ किमी भुयारी मार्ग, तसेच इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टिम योजना राबविण्यात येणार आहे. एआय आधारित सीसीटीव्ही, स्मार्ट शाळा आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील पाच वर्षात पुणे मनपात भाजपने ठोस काम केले त्यामुळे शहरात आमूलाग्र बदल झाला. विविध निवडणुकीत पुणेकर यांनी भाजपला साथ दिली आहे. पुणे शहराचं विस्तारीकरण आगामी काळात होणार त्यामुळे दूरदृष्टी ठेवून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे हे पालकमंत्री अजित पवार यांना कारभार सांभाळताना यापूर्वी लक्षात आले नाही का? आता पुणेकर विरोधकांना सत्तेत येण्यासाठी कोणती संधी देणार नाही. पुन्हा एकदा पुण्याचा महापौर भाजपचाच होईल कारण, जनतेचे आशीर्वाद भाजपसोबत आहे. केंद्रात पंतप्रधान आमचे, राज्यात मुख्यमंत्री आमचे तर पुण्याचा विकास देखील विरोधक नाही तर भाजपच करणार. जनतेने त्यांचा आशीर्वाद भाजपच्या उमेदवारांना द्यावा.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे सरकार वर्षानुवर्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा मध्ये होते. मागील निवडणुकीत बहुमत मिळून सलग पाच वर्ष भाजपचे सरकार दोन शहरात होते त्यामुळे अनेक विकासकामे सुरू झाली. मात्र, अजित पवार मागील काही दिवस विकासकामांच्या नावाने भाजपवर टीका करत आहेत. परंतु अजितदादा अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत त्यांनी त्यांच्या काळात भरीव विकास का केला नाही अशी विचारणा जनता आता करत आहे.