पुण्यातील कात्रज चौकात (KATRAJ CHAWK) गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाण पुलाचं (Flyover) काम सुरू आहे. याच उड्डाणपुलाच्या पुढील टप्प्याच्या कामासाठी 3 डिसेंबर पासून कात्रज चौकातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अवजड वाहनांना या परिसरातील काही रस्त्यांवर प्रवेश बंद असणार आहेत.
कात्रज परिसरातील वाहतुकीत खालील प्रमाणे बदल करण्यात येतील.
1. साताऱ्याकडून नविन बोगद्यामार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद असतील.
2. साताऱ्याकडून जुना कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पुल येथे प्रवेश बंद असतील.
3. सासवडकडून मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकातून पुढे प्रवेश बंद असतील.
4. बोपदेव घाटकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडी मशिन चौकातून पुढे प्रवेश बंद असतील.
5. स्वारगेटहून कात्रज मार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असतील.
6. मार्केटयार्ड, गंगाधाम, बिबवेवाडी मार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इस्कॉन मंदिराच्या पुढे प्रवेश बंद असतील.
7. सोलापुरहून हडपसर मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकातून पुढे प्रवेश बंद असतील.
8. मुंबईहून वारजे माळवाडी मार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद असतील.
जड वाहनांना बंदी
वाहतुकीत केलेल्या या बदलांबरोबरच अवजड वाहनांना म्हणजेच डंपर, हायवा, मिक्सर, हेवी मोटर व्हेईकल्स, हेवी गुड्स मोटार व्हेईकल्स, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल, ट्रेलर्स, कंटेनर्स या वाहनांना वरील रस्त्यांवर प्रवेश बंद असणार आहे. तसेच मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री दहा ते चार या वेळेत बंदी असणार नाही.