‘दादा, परत या’, कोथरूडमध्ये झळकत आहेत चंद्रकांत पाटील यांचे बॅनर

550 0

पुणे – सध्या कोथरूड भागात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हे बॅनर आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे. ‘दादा परत या’, ‘हरवले आहेत’ अशा आशयाचे हे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

एका बॅनरमध्ये चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावून ‘हरवले आहेत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. “पुणे शहरातील कोथरुड मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्याभरापासून हरवले आहेत. कोणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा. समस्त कोथरुडकर,” असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

तसेच “दादा, एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाही, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या, आम्ही तुमची वाट पाहतोय. समस्त कोथरुडकर.” असे दुसऱ्या बॅनरवर लिहिलेले आहे.

मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड मतदारसंघातून लढले आणि विजयी झाले. त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता. परंतु हा विरोध झुगारुन त्यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी देखील झाले. सध्या चंद्रकांत पाटील कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत व्यस्त आहे. ते सध्या कोथरुडमध्ये नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. पण हे बॅनर नेमके कोणी लावले याचा मात्र शोध लागू शकला नाही.

Share This News
error: Content is protected !!