स्वारगेट-महाबळेश्वर एसटी बसमध्ये बंदुकीची गोळी सापडल्याने खळबळ

458 0

पाचगणी – स्वारगेट- महाबळेश्वर एसटी बस पाचगणीमध्ये आल्यानंतर आज, गुरुवारी सकाळी एसटीमध्ये चक्क बंदुकीची गोळी आढळून आली. पोलिसांनी ही गोळी ताब्यात घेऊन तातडीने तपास सुरू केला आहे.

पुण्याहून महाबळेश्वरला येणारी एसटी (एमएच १४ बीटी १२२६) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाचगणी बसस्थानकात आली. यावेळी गाडीतील प्रवाशांना ही बंदुकीची गोळी दिसली. प्रवाशांनी वाहक धोत्रे यांच्या निदर्शनास ही गोळी आणून दिली. तोपर्यंत या घटनेची माहिती पाचगणी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनीही तातडीने बसस्थानकात धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून गोळी ताब्यात घेतली.

एसटीमधून किती प्रवासी आले होते. त्या सीटवर कोण बसले होते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. एखाद्या गुन्हेगाराच्या बॅगमधून चुकून गोळी खाली पडली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. पुण्याहून आलेल्या प्रवाशाकडेच पिस्तूल असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाचगणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश पवार हे अधिक तपास करीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!