वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबीयांची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आता पूजा खेडकर ची आई मनोरमा खेडकर यांची एक कंपनी आहे जी जप्त होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून ही मोठी कारवाई केली जाऊ शकते.
नेमकं प्रकरण काय ?
पूजा खेडकर हिच्या आईला गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिची पोलिसांकडून सखोल चौकशी देखील सुरू आहे. मात्र याचवेळी खेडकर कुटुंबीयांचा आणखी एक प्रताप पोलिसांच्या समोर आला आहे. पूजा खेडकर ने खोटे दिव्यांग प्रमाणपत्र बनवताना जो पत्ता दिला होता, तो पत्ता तिच्या घरचा नसून तिच्या आईच्या एका कंपनीचा आहे. या कंपनीपर्यंत आता पोलिस आणि महानगरपालिका ही पोहोचली आहे.
पूजा खेडकरने पिंपरी चिंचवड मधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून अपंगत्वाचा प्रमाणपत्र घेताना आपल्या राहत्या घराच्या पत्त्याऐवजी कंपनीचा पत्ता दिला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या तळवडे येथील ज्योतिबा नगर परिसरात मनोरमा खेडकर यांची थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीने महानगरपालिकेचा गेल्या दोन वर्षांपासूनचा तब्बल दोन लाख 77 हजार इतका कर थकवला आहे. त्याचबरोबर ही कंपनी खेडकर कुटुंबीयांच्या मालकीची असून ही कंपनी चक्कर रेड झोन असलेल्या जागेवर उभारण्यात आली आहे. त्यामुळे ही कंपनी देखील अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या कंपनीवर महानगरपालिका बुलडोझर चालू शकते, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.