पुणे :बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फल ज्योतिष अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित ज्योतिर्विदांचा मेळावा रविवारी उत्साहात पार पडला.कै पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.गो.ल. आपटे सभागृह(आपटे रस्ता) अथर्व हॉल मध्ये रविवार,दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ८ या दरम्यान हा मेळावा पार पडला.
अतुलशास्त्री भगरे,प्रतिभा शाहू मोडक, नंदकिशोर जकातदार,चंद्रकांत शेवाळे, विजय जकातदार यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले.अनिल चांदवडकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला, तर डॉ प्रसन्न मुळ्ये यांचा षष्टब्दिपूर्ती निमित्त गौरव करण्यात आला. मंडळाच्या वतीने नंदकिशोर जकातदार,विजय जकातदार, अॅड.मालती शर्मा,सौ नयना जकातदार,वरुण जकातदार मेघश्याम पाठक,आनंदकुमार कुलकर्णी यांनी मेळाव्याचे संयोजन केले.ऍड.मालती शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. सतीश जकातदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विवाहयोग,संतती योग,शिक्षणयोग,नोकरी व्यवसाय योग,परदेशगमन,कुंडलीवरून आरोग्य मार्गदर्शन,वास्तुशास्त्र,रुलिंग प्लॅनेट,हस्तलक्षण,भावेश विचार,उपासना महत्व इत्यादी विषयावर नामवंत ज्योतिर्विदांची व्याख्याने,संशोधनात्मक प्रबंधांची मांडणी,पुस्तक प्रदर्शन यांचे आयोजन या मेळाव्यात करण्यात आले होते.
उद्घाटन सत्रात बोलताना अतुलशास्त्री भगरे म्हणाले, ‘ कै. श्रीकृष्ण जकातदार यांच्या ज्योतिषशास्त्राच्या पोस्टल कोर्समुळे गावोगावी ज्योतिषशास्त्राचा प्रसार झाला.पुण्याईच्या मागे न लागता प्राणीमात्रांची काळजी घेण्याचा जो संदेश एकनाथ महाराजांनी दिला, तो आदर्श ज्योतिषांनी डोळ्यासमोर ठेवावा, आणि सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करावा. नवनवीन गोष्टी ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी शिकाव्यात, ज्ञान अद्ययावत ठेवावे, त्यासाठी असे मेळावे उपयुक्त ठरतात. कै. श्रीकृष्ण जकातदार यांच्या स्मृती जपणारा हा उपक्रम अनोखा आहे.