पुरंदरे यांनी ऑक्सफर्ड प्रेसला पाठवलेले पत्र मनसेकडून सादर, शरद पवार माफी मागणार का ?

732 0

मुंबई- जेम्स लेन प्रकरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी मनसेने केली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ऑक्सफर्ड प्रेसला पाठवलेले निषेध पत्र मनसेकडून समोर आणण्यात आले आहे. त्यामध्ये बाबासाहेबांनी जेम्स लेनचे पुस्तक मागे घेण्याची मागणी केली आहे. आता या पत्रावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माफी मागणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

ऑक्सफर्ड प्रेसला लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख आहे की, जेम्स लेनने त्याच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दिलेली आक्षेपार्ह माहिती ही त्याची स्वतःची कुटील कल्पना आहे. हे वादग्रस्त पुस्तक प्रकाशनाने मागे घ्यावे. अन्यथा या पुस्तकावर भारत सरकारने बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे . विशेष म्हणजे या पत्रावर स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांच्या बरोबरच खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार, निनाद बेडेकर, सदाशिव शिवदे , वसंत मोरे आदी मान्यवरांच्या सह्या आहेत. खासदार प्रदीप रावत वगळता सगळे मान्यवर इतिहास तज्ज्ञ आहेत. एकूणच शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत, असा दावा मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?

जेम्स लेनचं गलिच्छ लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेंच्याच माहितीवर आधारित होते. आपण जे लिखाण केलं, त्याची माहिती पुरंदरेंकडून घेतल्याचं लेन यांनी म्हटलं. जेम्स लेनने हे उघड सांगूनही पुरंदरे यांनी त्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे मी पुरंदरेंवर टीका केली असेल, तर मला त्याचं दुःख नाही, तर अभिमान वाटतो. त्यामुळे यावर कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल काही सुचवायचे नाही, असे म्हणत अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बुधवारी मुंबईत उत्तर दिले होते. परंतु आता हे पत्र समोर आल्यानंतर शरद पवार खरोखरीच माफी मागणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!