सार्वजनिक गणेशोत्सवाची मूहर्तवेढ रोवणाऱ्या हिदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती यापुढे बापाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी रथाना बैलांचा वापर करणार नाही. उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे तब्बल १३३ वर्षांपासूनची परंपरा आता खंडित होणार असली तरी मुक्या प्राण्याचे हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बालन यांनी स्पष्ट केले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या उत्सव मंडपाचे वासापुजन सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पुनीत बालन म्हणाले. की यंदाच्या वर्षी वरद विघ्नेश्वर वाडा ही सजावट गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. यावर्षी १८९२ पासून चालत आलेली परंपरा प्रथमच बदलून भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीत बैल जोडी न वापरण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. विसर्जन मिरवणूकीला विलंब होतो, त्यामुळे रथ ओढणाऱ्या बैलांचे हाल होतात. मुक्या प्राण्यांचे हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगमन मिरवणुकीत बाप्पाचा रथ ट्रस्टचे कार्यकर्ते व भक्त ओढतील व विसर्जन मिरवणुकीसाठी एक खास रथ तयार करण्यात येणार आहे त्यामध्ये श्रींची मिरवणूक निघणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.
तर याप्रसंगी बोलताना सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा म्हणाले की कुठल्याही कामाची सुरुवात आपण श्री गणेशाच्या आराधनेने करतो. अखंड हिंदुस्तानाचे श्री गणेशा हे श्रद्धास्थान आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज साता समुद्रापार पोहचला आहे. गणेशोत्सव हा कुठल्याही जाती धर्मापुरता मर्यादित नसून सर्वजण उत्साहाने या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे येणारा उत्सव हा सगळ्यांनी उत्साहात साजरा करूयात. या उत्सवासाठी पुणे पोलिसांची जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
झोन वनचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्यासह तुळशीबाग गणेश मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
तर मग फिल्म इंडस्ट्री बंद करा
सार्वजनिक गणेशोत्सवात गैर प्रकार चाललात, त्यामुळे हे उत्सव बंद करावेत अशी टिप्पणी अभिनेत्री माधवी गोखले यांनी यांनी केली होती, याबाबत बालन यांना विचारणा केली असता ते म्हणाले, त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शुभांगीताईंनी स्टंट केला. आमच त्यांना निमंत्रण आहे, त्यांनी पुण्यात यावे, येथील सर्वच गणेश मंडळ कसे धार्मिक, सामाजिक, आरोग्याचे उपक्रम राबवितात हे पाहावे. मी स्वतः फिल्म निर्मिता आहे, चित्रपटाच्या माध्यमातून अश्लीलता, व्यासनाधिता अशा गोष्टी दाखविल्या जातात. तर मग फिल्म इंडस्ट्री पण बंद करणार का असा टोलाही बालन यांनी लगाविला.