पुजा खेडकर प्रकरणानंतर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची नावे समोर येत आहेत. विविध सरकारी खात्यांमध्ये नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. अशाच तक्रारी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे देखील आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या ज्या शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली आहे, अशा सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून पूजा खेडकर यांनी आयएएस पदी स्वतःची वर्णी लावून घेतली. त्यामुळे आता दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या अनेक अधिकाऱ्यांकडे संशयाच्या नजरेतून बघितले जात आहे. दिव्यांग कोट्यातून शासकीय नोकरी लाटण्यासाठी अनेक शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ असलेले अधिकारी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत असल्याची प्रकरणे हळूहळू समोर येत आहेत. अशाच प्रकारच्या काही तक्रारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांबाबत या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने आता दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरीत रूजू झालेल्या शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाने संकलित करण्याचे आदेश गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर या तक्रारी व्हॅाटसॲपद्वारे प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.
शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी होणार आहे. यामध्ये दोषी आढळलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या आदेशाने दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांचे टेन्शन वाढवले आहे, हे नक्की.