प्रियकरावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मात्र त्याच्याच छळाला कंटाळलेल्या वीस वर्षीय इंजिनियर तरुणीने पंधराव्या मजल्यावरून उडी मारून (PCMC SUICIDE NEWS) स्वतःचं जीवन संपवलंय. प्रेम प्रकरणातून या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. आत्महत्येपूर्वी तिने रेकॉर्ड करून ठेवलेल्या व्हॉइस नोटमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. या व्हॉइस नोट मध्ये नेमकं काय होतं, याचा उलगडा आता झाला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
सहिती रेड्डी असं आत्महत्या केलेल्या तरुणीच नाव होतं. सहिती ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तिच्याच वर्गात शिकणाऱ्या प्रणव डोंगरे या मुलाशी तिचे प्रेम संबंध होते. सुरुवातीला या दोघांचं नातं अगदी छान होतं. प्रणव आपल्याला खूप जीव लावतो, खूप प्रेम करतो.. असा विचार करून ती स्वतःला भाग्यवान समजायची. मात्र हळूहळू प्रणव बदलला. तो सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला लागला. हळूहळू तिला या गोष्टी असह्य होऊ लागल्या. पण याविषयी ती कुणाशीही बोलत नव्हती. प्रणवचा विरोध केल्यास तो तिला प्रेम संबंध तोडण्याची धमकी द्यायचा. सहिती प्रणववर मनापासून प्रेम करायची, तिला त्याला गमवायचं नव्हतं. म्हणून तिने अनेक दिवस हा त्रास सहन केला. मात्र प्रणवचा त्रास कमी होण्याऐवजी वाढत राहिला. आणि अखेर हे सगळंच असह्य झाल्याने तिने राहत्या घराच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
आकस्मात मृत्यूची नोंद
सहिती रेड्डी हिने 5 जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास आत्महत्या केली. मात्र आपली मुलगी असं काही करू शकते हे तिच्या पालकांच्या कधी वाटलंच नव्हतं. त्यामुळेच या घटनेनंतर वाकड पोलीस ठाण्यात सहितीच्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कदाचित अपघातातून तिचा पाय घसरला असेल आणि ती खाली पडली असेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तिच्या मृत्यू नंतर तिच्या मैत्रिणीने सहितीने मृत्यूपूर्वी पाठवलेल्या व्हॉइस नोट बद्दल तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर सहितीचा मृत्यू हा आकस्मित नसून आत्महत्या असल्याचं स्पष्ट झालं. व कुटुंबीयांना हादरवून टाकणारं सत्य समोर आलं.
42 मिनिटांच्या व्हॉइस नोट
प्रणव आपल्याला देत असलेल्या त्रासाबद्दल सहितीने कुणाला काहीही सांगितलेलं नव्हतं. मात्र आपल्या मृत्यूच्या पश्चात या गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींना समजाव्यात असं तिला वाटत होतं. त्यामुळेच मृत्यूपूर्वी तिने आपल्या फोनमध्ये तीन व्हॉइस नोट रेकॉर्ड करून ठेवल्या. त्यानंतर सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला तिने एक व्हॉइस नोट पाठवली. ज्यामध्ये तिने तिचा मोबाईल टेरेसवर लपवलाय, त्याचा पासवर्ड आणि बिल्डिंग मध्येच राहणार आहे का मित्राचा मोबाईल नंबर सांगितला होता. ही व्हॉइस नोट आत्महत्येच्या तीन तासानंतर मैत्रिणीला मिळेल अशी सेटिंग तिने करून ठेवली होती. हे सगळं करून काही वेळातच तिने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर जेव्हा तिचे मित्र मैत्रिणी, तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेले, त्यावेळी मैत्रिणीने ही गोष्ट सांगितली. त्यानुसार या सर्वांनी मिळून सहितीचा मोबाईल अनलॉक केला. ज्यामध्ये या तीन व्हॉइस नोट सापडल्या. तब्बल 42 मिनिटांच्या या व्हॉइस नोट मध्ये तिने प्रणव देत असलेल्या त्रासाची आपबिती सांगितली होती. हे रेकॉर्डिंग आई वडील, मित्र-मैत्रिणी आणि प्रणवसाठी होते. याच प्रणवचं सहितीच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं. मात्र त्याच्याशी आपल्या मुलीचे प्रेम संबंध असतील, किंवा तो तिला इतका त्रास देत असेल असा संशयही सहितीच्या कुटुंबीयांना आला नाही. मात्र त्या व्हॉइस नोटने प्रणवचा खरा चेहरा जगासमोर आणला. व्हॉइस नोट ऐकल्यानंतर सहिताच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. प्रणव डोंगरे या वर्गमित्रांमुळे तिने आत्महत्या केली असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपी प्रणवला अटक केली आहे.