पुणे – दिनांक २४\०७\२०२४ रोजी दुपारी १२•४१ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात चंदननगर, बॉम्बे सॅपरस कॉलनी येथे घराचा दरवाजा लॉक झाल्याने कुटूंब अडकल्याची वर्दि प्राप्त होताच येरवडा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.
सदर घटनास्थळी जवान पोहोचताच त्यांनी पहिले की, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरामध्ये सदर घटना घडली असून तेथे आई व तीन वर्षाचे बाळ बाथरुममध्ये असताना दुसऱ्या एका दिड वर्षाच्या बाळाकडून खेळता खेळता अचानकपणे कडी लावली गेली आणि मुख्य दरवाजाला ही लॅच लॉक असल्याने आई व दोन लहान मुले आतमध्ये अडकली होती. त्याचवेळी जवानांनी सदर कुटुंबासमवेत संपर्क साधत धीर देत शेजारील बाल्कनीमध्ये प्रवेश करुन कटावणी, पहार, हातोडा याचा वापर करीत दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश करत त्या तिघांची सुखरुप सुटका केली.
या कामगिरीत येरवडा अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक रघुनाथ भोईर व फायरमन सुनिल टेंगळे, ऋषिकेश जरे, अमोल रणदिवे, विजय जाधव यांनी सहभाग घेतला.