पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. २०) मोठ्या चुरशीने मतदान झाले.
जिल्ह्यातील मुळशी व हवेली या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित ९ तालुक्यात पैकीच्या पैकी (१०० टक्के) मतदान झाले आहे.
मुळशी तालुक्यात ६० टक्के तर हवेली तालुक्यात ९६.८८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण ९९.०१ टक्के मतदान झाले आहे. येत्या सोमवारी (ता.२१) सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरू केली जाणार आहे. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर केले जाणार असल्याचे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी सांगितले.
जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या १६ जागा आहेत. यापैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकीतील उर्वरित ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. या निवडणुकीसाठी आंबेगाव, भोर, दौंड, खेड, जुन्नर, शिरूर, मावळ , पुरंदर आणि. वेल्हे या नऊ तालुक्यात १०० टक्के मतदान झाले असल्याचे सज्ञायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बारामती व इंदापूर हे दोन तालुके वगळता उर्वरित अकरा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक तालुकास्तरीय मतदारसंघ आहे. या तालुकास्तरीय मतदारसंघाच्या अकरा, महिलांसाठीच्या दोन आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), भटक्या जाती, विमुक्त जमाती (व्ही. जे. एन. टी.) आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.
मतदान झालेले तालुकास्तरीय मतदारसंघ
आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, मावळ, मुळशी आणि शिरूर (एकूण सात जागा).
महिला राखीव — २ जागा
नागरिकांचा मागास प्रवर्ग — १ जागा
भटक्या जाती-विमुक्त जमाती प्रवर्ग — १ जागा
तालुकानिहाय झालेले मतदान
आंबेगाव —-४८
भोर —- ७०
दौंड —- ८०
जुन्नर —- १०९
खेड —- १०६
शिरूर —- १६८
मावळ —-२१
मुळशी —-०९
पुरंदर —-४१
हवेली —-३१
वेल्हे — ११
एकूण —- ७०२.