सप्टेंबर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ‘या’ विधानानं राज्यात खळबळ
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून मोठा दावा करत असून आता सप्टेंबर महिन्यात मुख्य खुर्ची बदलेल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सप्टेंबरमध्ये सत्तेतून पायउतार होतील, असे वडेट्टीवार यांनी भाकित केले आहे. आज राज्यात सत्तेच्या हव्यासापोटी वाट्टेल ते चालले आहे. राज्यात काहीच ऑलवेल नाही. दोन उपमुख्यमंत्री येतात तिथे मुख्यमंत्री येत नाहीत. वडेट्टीवार यांनी दावा केला की, सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल. अर्थातच सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असे मी म्हणत नाही. पण मुख्य खुर्ची मात्र बदलेल, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले
राज्यातील राजकीय वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे. कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारत आहेत. तिघेही कधी एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री एकत्र आले की मुख्यमंत्री येत नाहीत. हे सर्व राज्यात चाललं आहे. साधं जेवणासाठी बोलावल्यावरही एक उपमुख्यमंत्री डिनरला जात नाही. याचा अर्थ अलबेल नाहीये. महाराष्ट्रातील जनतेला सत्ताधाऱ्यांचं नाटक आणि तमाशा दिसत आहे. यांनी महाराष्ट्राची पत घालवली आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
