Vasant More : वसंत मोरे यांच्या विविध नेत्यांसोबतच्या भेटीत नेमकं होतं तरी काय ? TOP NEWS ची INSIDE STORY
पुणे : मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी विविध पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठींचा धडाका लावलाय… वसंत मोरे यांनी कायमच भाजपला विरोध केला. त्यामुळे महायुतीतील पक्षांबरोबर न जाता महाविकास आघाडीतील पक्षांबरोबर जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्या अनुषंगाने त्यांनी अनेकांच्या भेटी ही घेतल्या, तर काही नेते हे स्वतः वसंत मोरे यांच्या भेटीला गेले. पण वसंत मोरे यांच्या या भेटीगाठीं मागे नेमक कारण काय ? या भेटीत नेमकी कशावर चर्चा होते? जाणून घेऊया TOP NEWS च्या या इनसाईड स्टोरी च्या माध्यमातून…
मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांबरोबरच्या सततच्या संघर्षामुळे वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रूपाली पाटील यांनी त्यांचे भेट घेत पक्षप्रवेशाचा प्रस्ताव ठेवला. मात्र याबाबतचा कुठलाही निर्णय वसंत मोरे यांनी जाहीर केला नाही. पुढे त्यांनी ‘एक वेगळी दिशा, माझ्या पुण्याच्या हिताची’अशा आशयाची पोस्ट केली. त्यानंतर पुन्हा वसंत मोरे हे नव्या पक्षात जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या. मोरेंनी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचीही राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जाऊन भेट घेतली. त्यानंतर जयंत पाटलांनी आपल्याकडे काही गोष्टी लिखित स्वरूपात मागितल्या आणि त्या मी त्यांना दिल्या, असं सांगितलं. मात्र मोरेंनी जयंत पाटलांना लिखित स्वरूपात नेमकं काय दिलं ? त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
मग मोरेंनी आत्ताचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि त्या वेळचे इच्छुक आमदार रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली. ही भेट मी केवळ धंगेकरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी घेतली असल्याचं मोरेंनी माध्यमांना सांगितलं. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अनेक वेळा भेटीगाठी झाल्यामुळे या दोन पैकी एका पक्षात मोरे प्रवेश करतील, आणि त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशा चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांचे नाव समोर आलं. त्यानंतरही मोरेंनी ‘निवडणूक एकतर्फी कशी होते हे बघतोच’ अशा आशयाची पोस्ट केली. ही पोस्ट म्हणजे मुरलीधर मोहोळ यांना ओपन चॅलेंज होतं. त्याचबरोबर मी ठरवलेल्या विकासाच्या वाटेवर कोणाला चालायचंच नाहीये असं वक्तव्य करत महाविकास आघाडीतील पक्षप्रवेशाच्या चर्चा फिस्कटल्याचं मोरेंनी बोलून दाखवलं. यानंतर वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा ओसरल्या आणि मोरे हे अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्या. मी लोकसभा निवडणूक लढवणारच आणि खासदार होणारच असं अनेकदा वसंत मोरे म्हणाले. वेळ पडल्यास अपक्षही उभा राहण्याची तयारी त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे वसंत मोरे अपक्ष उभे राहणार हे कुठेतरी निश्चित होतंय असं वाटतानाच आता मोरेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. वसंत मोरे यांनी मुंबई येथे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
या भेटीनंतर वसंत मोरे वंचित कडून पुणे लोकसभेची निवडणूक लढवणार का या चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, की राज्यात लवकरच नव्या राजकारणाची सुरुवात होणार आहे. वसंत मोरे यांच्या उमेदवारीबद्दल आणि या नव्या राजकारणाबद्दल 31 मार्च पर्यंत सविस्तर माहिती जाहीर केली जाईल. तर वसंत मोरे म्हणाले की आंबेडकरांबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे. अंतिम निर्णय आंबेडकर हे 31 तारखेपर्यंत जाहीर करतील. यावरून तरी वसंत मोरे हे वंचितच्या वाटेवर जाणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र या आधीच्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठींतून काहीच साध्य झालं नाही. वसंत मोरे यांच्या कामाची पद्धत, आणि त्यांच्या मनात असलेला विकास, हा विकास करण्यासाठी नेमकं काय करायला हवं.. अशा सर्व चर्चा वसंत मोरे नेत्यांच्या भेटींमध्ये करतात. मात्र कदाचित त्यांचे हे प्रस्ताव कोणत्याच पक्षाला अद्याप मान्य झालेले नाहीत. आज प्रकाश आंबेडकर यांना भेटलेले वसंत मोरे हे तीन-चार दिवसांपूर्वी सकल मराठा समाजाच्या बैठकीतही दिसले होते. या बैठकीत त्यांनी आपण भविष्यात सकल मराठा समाजाचा अधिकृत उमेदवार म्हणून समोर येऊ शकतो असे संकेत दिले होते. अर्थात तशी त्यांची इच्छा आहे. मात्र त्याबाबतची कोणतीही चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर झालेली नाही. अशातच आता प्रकाश आंबेडकरांना भेटल्यामुळे वसंत मोरे हे उमेदवारीसाठी कुणाकुणाच्या दारात जाणार अशा प्रकारची टीका त्यांच्यावर होत आहे. मात्र माझ्या शहराच्या विकासासाठी कुणाच्या दारात जायला कमीपणा कशाला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे वसंत मोरे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार की मग अपक्षच निवडणुकीला सामोरे जाणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Satara Toll : पुणे-सातारा प्रवास महागला
Satara Loksabha : शरद पवारांना मोठा धक्का! श्रीनिवास पाटलांनी सातारा लोकसभा लढवण्यास दिला नकार
Smita Wagh : चर्चेतील चेहरा : स्मिता वाघ
Govinda : अभिनेता गोविंदा बनणार का राजकारणात पुन्हा एकदा हिरो नंबर 1?
