EKNATH SHINDE

नवी मुंबई भूखंडांवरून महायुतीत खळबळ; नाईकांच्या आरोपांना शिंदेंचं थेट प्रत्युत्तर

42 0

नवी मुंबईतील भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आघाडीत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. मंत्री गणेश नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करत नगरविकास खात्यावर गंभीर आरोप केले होते.

नाईक यांनी आरोप केला की, नवी मुंबईतील काही भूखंड बिल्डरांच्या फायद्यासाठी वळवण्यात आले. “मी ज्या मंत्रिमंडळाचा भाग आहे, त्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्यातील अधिकाऱ्यांनी असा प्रकार केला, याची मला लाज वाटते,” असे ते म्हणाले. तसेच सिडको आणि एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेला विकासासाठी देण्यात येणारे भूखंड तात्काळ हस्तांतरित करावेत, अशी मागणी त्यांनी केली. “जनतेच्या हितासाठी काम करता येत नसेल, तर मंत्रिपदाचा उपयोग काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नाईक यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी महायुतीतच मतभेद उघड झाले. शिवसेना शिंदे गटाकडून लगेचच प्रत्युत्तर देण्यात आले. मंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांनी नाईक यांच्या आरोपांना फेटाळून लावत त्यांच्यावरच पलटवार केला. काही नेत्यांकडून ही टीका राजकीय असूयेपोटी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

दरम्यान, या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. “गणेश नाईकांना काल श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलं आहे,” असे सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले. यापूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कठोर शब्दांत इशारा दिला होता.

या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबईतील भूखंडांचा प्रश्न आता केवळ प्रशासकीय न राहता राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरत असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!