महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून, सर्वच पक्ष हे आपल्याला कशा जास्तीत जास्त जागा मिळतील. या दृष्टिकोनातून मतदारसंघांवर दावे करताना दिसून येत आहेत. मावळ विधानसभेच्या जागेवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपामध्ये संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येतंय.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीमध्ये जागावाटपावरून सत्ता संघर्ष असल्याचं दिसून येत आहे. नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आगामी काळात ज्यांची निवडून येण्याची पात्रता आहे अशाच उमेदवारांना महायुतीकडून विधानसभेचे तिकीट दिल जाणार आहे. त्यासाठी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी पक्षाच्या आमदारांच्या कामगिरीचं अंतर्गत सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे. परंतु मावळ विधानसभेच्या जागेवरून जागावाटप होण्याच्या आधीच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात संघर्ष सुरू झालाय. मावळ विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांचा पराभव करत निवडून आले. आमदार सुनील शेळके यांनी मी मावळचा विद्यमान आमदार आहे त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल असा दावा केलाय. तर भाजपाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा म्हणून मावळची महाराष्ट्रात ओळख आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ तालुका आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी म्हणून आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत. महायुतीमध्येही जागा भाजपला मिळावी. ही आमची पहिली आग्रहाची मागणी आहे आणि कमळ हा आमचा चेहरा असणार आहे”, असा दावा बाळा भेगडे यांनी केलाय. मावळमध्ये अजित पवार गट आणि भाजपाची मोठी ताकद असल्याने मावळच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार गटांमध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.