महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला तिसरा पर्याय म्हणून ‘परिवर्तन’च्या तीन दिग्गज नेत्यांनी आपली ‘महाशक्ती’ पणाला लावली पण 107 पैकी एकही जागा जिंकता नं आल्यानं या नेत्यांची उरली सुरली शक्तीही गळाली. छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू या तीन दिग्गज नेत्यांपैकी निवडणूक रिंगणात उतरलेल्या बच्चू कडू यांना तर त्यांच्याच मतदारसंघात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. विधानसभा निवडणुकीत परिवर्तन महाशक्तीचा कसा राहिला परफॉर्मन्स?
छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू या तीन नेत्यांच्या पक्षांनी आणखी 05 पक्ष सोबत घेऊन एकूण 08 पक्षांचे उमेदवार एका ‘बॅनर’खाली विधानसभा निवडणुकीत उतरवले होते. एकूण 107 उमेदवारांच्या या आघाडीचं नाव होतं परिवर्तन महाशक्ती! छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे 32, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचे 19 आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या 38 उमेदवारांनी निवडणूक लढवली. ‘परिवर्तन महाशक्ती’मध्ये सामील असलेल्या अन्य 05 पक्षांपैकी रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) चे 06, जय विदर्भ पक्षाचे 05, स्वतंत्र भारत पक्षाचे 03, तर भारतीय जवान किसान पक्ष आणि महाराष्ट्र राज्य समिती या दोन पक्षांनी प्रत्येकी 02 जागी आपले उमेदवार उभे केले. मात्र, या सर्वच्या सर्व म्हणजे 107 ही उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.
‘प्रहार’च्या बच्चू कडू यांचा ‘होम पिच’वरच पराभव!
‘प्रहार’चे बच्चू कडू यांचा बालेकिल्ला म्हणजे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर! मात्र आमदारकीचा विजयी चौकार मारलेल्या बच्चू कडू यांना 2024 च्या निवडणुकीत आपल्याच मतदारसंघात पराभूत व्हावं लागलं. भाजपच्या विजय तायडे यांनी 12 हजार 131 मतांनी त्यांचा पराभव केला. ‘परिवर्तन महाशक्ती’ची उभारणी करण्यात मोठा वाटा उचललेल्या बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यालाच पराभव पाहावा लागल्यानं ‘परिवर्तन महाशक्ती’ला मोठा धक्का बसला. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या इतर 37 उमेदवारांची कामगिरी पाहिल्यास त्यातील बच्चू कडू आणि गणेश निंबाळकर हे दोघे जण दुसऱ्या स्थानी राहिले. चांदवड मतदारसंघात गणेश निंबाळकर यांनी चांगली फाइट दिली. 48, 961 मतांनी त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या उमेदवारीमुळं काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार कोतवाल यांना घरी बसावं लागलं. 23,335 मतं घेऊन ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. नेवासा येथे तिसऱ्या स्थानी राहिलेले नेवासाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांना 35,331 मतं मिळाली. त्यांच्या उमेदवारीमुळं विद्यमान आमदार आणि यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभे राहिलेल्या शंकरराव गडाख यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांचा 4021 मतांनी पराभव झाला. बाळासाहेब मुरकुटे यांनी 2014 मध्ये शंकरराव गडाख यांचा पराभव केला होता. त्यावेळी मुरकुटे भाजपकडून तर गडाख राष्ट्रवादीकडून लढले होते. 2019 मध्ये गडाख यांनी आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातून निवडणूक लढवून भाजपच्या मुरकुटे यांचा पराभव केला होता. 2009 च्या निवडणुकीत गडाख यांनी भाजपचे उमेदवार विठ्ठल लांघे यांचा पराभव केला होता. मात्र, खरी गंमत तर पुढंच आहे. गडाख, मुरकुटे आणि लांघे हे एकमेकांविरुद्ध लढलेले तिन्ही उमेदवार यावेळी वेगवेगळ्या पक्षातून लढले. एकेकाळी भाजपकडून लढलेले विठ्ठल लांघे यावेळी शिवसेनेकडून लढले, तर 2019 च्या निवडणुकीत आमदार झालेले शंकरराव गडाख स्वतःच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातून न लढता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढले. एकेकाळी भाजपकडून लढलेले बाळासाहेब मुरकुटे यावेळी प्रहारकडून लढले. अखेर 2024 च्या लढाईत विठ्ठल लांघे यांचा विजय झाला. मेळघाटचे विद्यमान आमदार राजकुमार पटेल आणि देगलूरमध्ये माजी आमदार सुभाष साबणे यांनाही पराभूत व्हावं लागून तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. नेवासा, अर्जुनी मोरगाव, अर्णी, आर्वी, बागलाण, निफाड, सोलापूर दक्षिण, देगलूर आणि मेळघाट या 09 ठिकाणी प्रहारचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले ही त्यातल्या त्यात जमेची बाजू!
पश्चिम महाराष्ट्रात ‘स्वाभिमानी’ची हाराकिरी!
19 जागी लढलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाची या निवडणुकीत हाराकिरी पाहायलास मिळाली. हातकणंगले, कराड दक्षिण आणि शिरोळ या तीन ठिकाणी तिसऱ्या स्थानी राहण्या व्यतिरिक्त या पक्षाच्या हाती फार काही लागलं नाही.
छत्रपती संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’ला धक्का!
32 जागी लढलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या ‘स्वराज्य’ला या निवडणुकीत धक्का बसला. एकही उमेदवार निवडून आला नाहीच पण त्यांच्या उमेदवारांची कामगिरी देखील फारशी समाधानकारक झाली नाही. कळवण आणि कुडाळ या दोन जागी त्यांचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले बस इतकंच!
स्वतंत्र भारत पक्ष वगळता अन्य पक्षांची कामगिरी सुमार दर्जाची!
स्वतंत्र भारत पक्षानं 03 जागा लढवल्या. माजी आमदार वामनराव चटप यांनी राजुरात चांगली फाइट दिली. त्यांना 55090 इतकी मतं मिळाली. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या चटप यांच्या उमेदवारीमुळं काँग्रेसच्या सुभाष धोटे यांना 3054 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. रिपब्लिकन पक्ष (खोरिपा), जय विदर्भ पक्ष, भारतीय जवान किसान पक्ष आणि महाराष्ट्र राज्य समिती हे 04 पक्ष विशेष कामगिरी दाखवू शकले नाहीत.
एकूणच काय तर महाराष्ट्रात परिवर्तन घडवायला निघालेल्या छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू या तीन दिग्गज नेत्यांनी विविध 08 पक्षांची मोट बांधून निवडणूक लढवली खरी पण परिवर्तनाच्या या लढाईत आणि महायुतीच्या लाटेत या नेत्यांची महाशक्ती गळून पडली!
संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, ‘TOP NEWS मराठी’
‘एमआयएम’चं ‘कटी पतंग’ सुरूच! एक पतंग उडाला, 16 कटले!