CROCODILES AT BJP LEADER'S HOME : रोकड शोधायला गेले अन् थेट मगरीच सापडल्या.. ; भाजपच्या माजी आमदाराच्या घरातलं दृश्य पाहून आयकर अधिकारी हादरले

CROCODILES AT BJP LEADER’S HOME : रोकड शोधायला गेले अन् थेट मगरीच सापडल्या.. ; भाजपच्या माजी आमदाराच्या घरातलं दृश्य पाहून आयकर अधिकारी हादरले

3194 0

करचोरीच्या आरोपावरून भाजप एका बड्या नेत्याच्या घरी छापे टाकल्यानंतर आयकर विभागाच्या (income tax) अधिकाऱ्यांना हादरवून टाकणारी गोष्ट सापडली आहे. बेहिशेबी संपत्ती शोधायला गेलेल्या आयकर विभागाला भाजप नेत्याच्या घरात चक्क मगरी सापडल्या आहेत (CROCODILES AT BJP LEADER’S HOME). हे दृश्य पाहून अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. दरम्यान या प्रकरणी संबंधित नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात घडली आहे. या ठिकाणचे बंडा विधानसभा मतदारसंघातले स्थानिक माजी आमदार हरवंशसिंह राठोड यांच्या घरी हा धक्कादायक प्रकार घडला.

भाजपचे माजी आमदार हरवंशसिंह राठोड आणि बीडी कन्स्ट्रक्शन व्यावसायिक राजेश केशरवानी यांच्या घरी धाडी टाकल्या. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर चोरी केल्याचे आरोप करण्यात येत होते. त्याच अनुषंगाने बेहीशेबी मालमत्ता शोधण्यासाठी या दोघांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली.

काय काय सापडलं ?

आयकर विभागाच्या पथकांनी केलेल्या या कारवाईत कोट्यवधी रुपयांची करचोरी पकडली गेली आहे. या दोघांनी 150 कोटी रुपयांची करचोरी केली असल्याचं टीमच्या लक्षात आलं. त्याचबरोबर या तपासात दोनशे कोटी रुपयांहून अधिक संपत्तीही आढळून आली आहे. छापेमारीत अधिकाऱ्यांना 14 किलो सोनं आणि तीन कोटी 80 लाख रुपये मिळाले. भाजपचे माजी आमदार हरवंशसिंह राठोड यांच्या घरी कोट्यावधींची मालमत्ता सापडली असून बिडी व्यावसायिक राजेश केशरवानीच्या मालमत्तांवर टाकलेल्या धाडीत सात आलिशान गाड्या देखील मिळाल्या आहेत.

आमदाराच्या घरी थेट मगरीच सापडल्या…

या छापेमारीत अधिकाऱ्यांना घाम फोडणारी गोष्ट सापडली ती माजी आमदारांच्या घरी… राठोड यांच्या घराच्या परिसरात स्वतःचा एक तलाव असल्याची गोष्ट अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. हा तलाव नजरेस पडल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याचीही तपासणी केली. त्यावेळी या तलावात चक्क तीन छोट्या मगरी असल्याचं दिसून आलं. याची माहिती तात्काळ आयकर विभागाने वनविभागाला दिली. हिंस्त्र प्राणी घरात पाळण्यास बंदी आहे. तरीही राठोड यांच्या घरी या मगरी कशासाठी ठेवण्यात आल्या होत्या ? या मगरी कुठून आणल्या? आणि कधीपासून पाळण्यात येत होत्या ? याचा तपास वनविभागाकडून केला जाणारा आहे. दरम्यान या प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!