मुंबई : शरद पवार व अजित पवार यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीतून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भेटी झाल्या. एका घरगुती कार्यक्रमातही दोघांची भेट झाली. मात्र, या सर्व भेटी व्यावसायिक व कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत. या भेटीतून आम्ही इतर पक्षाशी युती करण्याच्या प्रयत्नात आहोत, असा होत नाही.
शरदचंद्र पवार यांच्या पक्षासोबत तर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी म्हटले.
शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांचे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याबद्दल विचारले असता, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे
यांच्या नेतृत्वात महायुती मजबूतपणे वाटचाल करीत असल्याने इतर पक्षातील लोकांचे प्रवेश होतच राहतील, असेही पटेल यांनी सांगितले.