संदीप देशपांडे यांच्या अडचणी वाढणार ! गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले चौकशीचे आदेश

427 0

मुंबई – पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून जाणे मनसे नेते संदीप देशपांडे यांना महागात पडण्याचे चिन्ह आहेत. या प्रकरणी आता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपाखाली संदीप देशपांडेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

आज सकाळी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ बाहेर देशपांडे यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आले होते. पण या दरम्यान देशपांडे पोलिसांसमोरच गाडीत बसून पळून गेले. यावेळी झालेल्या झटापतीत एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणाची गंभीर दखल राज्याच्या गृहमंत्रालयाने घेतली असून देशपांडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. याबाबतचे ट्विट शंभूराज देसाई यांनी केले आहे. त्यामुळे संदीप देशपांडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नेमके काय घडले ?

मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी वाहनात बसले. या वाहनात पोलीस बसण्याचा प्रयत्न करत असताना ही कार भरधाव वेगाने निघून गेली. देशपांडे यांना पकडताना झालेल्या झटापटीमध्ये महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडली.

Share This News
error: Content is protected !!