RAJ THACKERAY MIRA BHAINDAR SPEECH मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मीरा भाईंदर मध्ये जाहीर सभा पार पडले असून हिंदी भाषा सक्ती वरून राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
राज ठाकरेंच्या आजच्या भाषणातील प्रमुख मुद्दे अगदी जसेच्या तसे
१) त्या दिवशी मिठाईवाल्याच्या बाबतीत जो प्रसंग घडला तो साधा होता.
हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला म्हणून महाराष्ट्र सैनिक आनंद साजरा करत होते, तर एक आगाऊ मिठाईवाला म्हणाला की इथे तर हिंदीच चालणार,
हे ऐकल्यावर महाराष्ट्र सैनिकांनी जे करायचं ते केलं. आता कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच…
त्या अमराठी मिठाईवाल्याने आगाऊपणा केला म्हणून त्याच्या कानाखाली बसली. मग त्यावर इथल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला,मोर्चा काढला.
मोर्च्या काढणाऱ्या कानाखाली मारली होती का ? अजून नाही मारली आहे.. कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही हे सगळं करणार…
तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत… किती काळ दुकानं बंद करून राहणार आहात ? शेवटी आम्ही काही घेतलं तरच दुकान चालणार ना.
महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठी शिका, आमचं काही भांडण नाहीये तुमच्याशी. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार….
२) राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करणारच असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले,
मुख्यमंत्र्यांनी पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून दाखवावा,
मी त्यांना सांगतो की तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू.
सरकारला हिंदी सक्तीची करून आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी करावी.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीची सक्ती सोडून हिंदीच्या सक्तीसाठी प्रयत्न करतोय ?
कोण दबाव आणत आहे तुमच्यावर?
३) संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रचंड लढा लढला गेला, मुंबईला वेगळे करण्याचा डाव होता तो कोणाचा होता?
तर तो काही गुजराती नेते, गुजराती व्यापाऱ्यांचा होता. आचार्य अत्रे यांनी एका पुस्तकात म्हटले आहे की वल्लभभाई पटेल ह्यांनी महाराष्ट्राला मुंबई देण्यास प्रथम विरोध केला.
आम्ही देशाचे लोहपुरुष म्हणून तुमच्याकडे आदराने पाहत होतो. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात ?
पुढे मोरारजी देसाईंनी गोळीबार करून मराठी माणसांना ठार मारलं होतं. गेली अनेक वर्ष यांचा मुंबईवर डोळा आहे.
हे चाचपडून बघत आहेत तुम्हाला… हिंदी भाषा आणून बघायची, मराठी माणूस पेटतोय का बघायचं आणि तो शांत बसला तरी हिंदीची सक्ती करायची.
हिंदी भाषा सक्ती ही पहिली पायरी आहे, त्यावर मराठी माणूस शांत बसला तर मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला जोडायची हा खरा डाव आहे.
त्यामुळे राज्यातील मराठी माणसांनी सावध राहण्याची गरज आहे.
हा डाव अगदी आधीपासूनचा आहे, पूर्वी तो उघडउघड होता, आता थोडा लपूनछपून प्रयत्न केला जातो.
४) जगातील एक मोठं सत्य आहे. तुमची भाषा मेली आणि तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्हाला कोणीही विचारणार नाही… तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन टिकवणं महत्वाचं आहे.
५) फक्त मुंबईत काही झालं तर हिंदी चॅनल्स अजेंडा चालवतात. ही कसली हिंदी चॅनेल्स. ही तर सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहेत. थोड्या वेळाने सुरु करतील, ‘राज ठाकरेने उगला जहर’… फक्त मुंबईत आणि महाराष्ट्रात काही झालं की कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनातील रागातून ही लोकं पेटून उठतात. २०१८ साली २० हजार बिहारी लोकांना गुजरात मधून हाकलून लावले, तेव्हा बातम्या नाही झाल्या. ज्याने हाकलले तो आज भाजप मध्ये आमदार आहे. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा बिहारी लोकांना हाकलले, एकही बातमी झाली नाही. इथे महाराष्ट्रात एका मिठाईवाल्याच्या कानाखाली बसली तर देशभर बातम्या?
६) मराठी भाषेला अडीच तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. हिंदीला २०० वर्षांचाच. अभिजात भाषेचा दर्जा मिळायला साधारण १४०० वर्षे लागतात. म्हणजे हिंदीला हा दर्जा मिळायला अजून १२०० वर्षे आहेत, ती भाषा आमच्या मुलांनी सक्तीने का शिकायची?
७) हिंदी ही कुणाचीही मातृभाषा नाही. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील अनेक मातृभाषांसह २५० भाषा हिंदीने मारल्या. अगदी हनुमान चालिसासुद्धा अवधी भाषेत आहे, हिंदी नव्हे. तिथल्या लोकांना उलट ही गोष्ट सगळ्यात आधी समजायला हवी.
८) भाषा कोणतीही वाईट नसते, पण ती भाषा सक्तीने लादणे खपवून घेणार नाही. आमच्यावर लादणार असाल तर आम्ही नाही बोलणार. लहान मुलांवर तर नाहीच लादू देणार.
९) हिंदुत्वाच्या आडून तुम्ही मराठी संपवायला येणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही.हे हिंदवी स्वराज्य व्हावे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य होते, हिंदूवी नव्हे, हिंदवी. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे राज्य केलेला हा महाराष्ट्र आहे. इथे आमच्यावर बाहेरच्यांनी येऊन राज्य नाही करायचं. मराठी माणूस या ठिकाणचा मालक आहे.
१०) इथे व्यवसायाला आलेल्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे, माज करू नये, आम्ही तुमच्याशी मराठीतच बोलू. मराठी माणसाला स्वतःहून काही करायची गरज नाही, कुणाच्या अंगावर जायची गरज नाही पण समोरचा कुणी माज घेऊन आला तर ठेचायचाच.
११) भाजपचा खासदार दुबे म्हणाला मराठी माणसांना आम्ही आपटून मारणार. त्याच्यावर केस नाही झाली, कुठेही हिंदी चॅनल्सवर बातम्या नाही झाल्या. त्याने मुंबईत येऊन दाखवावे, मग कळेल कोण कुणाला कसा मारतो. इकडे ये तुला इथल्या समुद्रात डुबे डुबे कर मारेंगे….
१२) इतर राज्यात तिथले सरकार स्थानिकांच्या मागे असते, आपल्याकडे तसे होत नाही; पण सरकारने एक लक्षात ठेवावे, तुमची सत्ता विधानभवनात असेल आमची रस्त्यावर सत्ता आहे. मराठी माणसाने बिनधास्त छाती बाहेर काढून चालावे, छातीठोकपणे चालावे, महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे. परत कुणी वेडावाकडा वागल्यास आमचा हात आणि समोरच्याचा हात याची युती होणारच.
१३) अनेक पत्रकार म्हणतात, स्क्रिप्ट फडणवीसांची आहे. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना सगळ्यांच्या दबावाला बळी पडून २ शासन निर्णय मागे घ्यावे लागले. स्क्रिप्ट असती तर फडणवीसांचा असा अपमान लिहला असता का? स्क्रिप्ट वगैरे काही नाही हे फक्त तुमच्या मनात विष कालवण्याचे प्रयत्न आहेत.
१४) माझी कोणाशीही मैत्री असो की शत्रुत्व. मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र या विषयात राज ठाकरे कुणाशीही तडजोड करणार नाही. तुम्हीही करू नका…
१५) मराठी माणसाला माझं सांगणं आहे, प्रत्येक ठिकाणी समोरच्याशी मराठीत बोला, समोरच्याला मराठीत बोलायला भाग पाडा आणि सदैव सतर्क राहा.