मुंबई : राज्यात सत्तातरानंतर शिवसेनेचं पहिलंच राष्ट्रीय महाअधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमध्ये पार पडणार आहे. या 2 दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान अधिवेशनापूर्वी खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जी चूक उद्धव ठाकरे यांनी केली ती आम्ही करणार नाही असे ते म्हणाले आहेत.
नेमके काय म्हणाले राहुल शेवाळे?
जी चूक उद्धव ठाकरेंनी केली ती आम्ही करणार नाही, या अधिवेशनांची नोंद निवडणूक आयोगाला देणार आहोत. बाळासाहेबांच्या पक्ष घटनेनुसार आधी काम केले जात नव्हते, पदांच्या नेमणुकांची माहिती निवडणूक आयोगाला दिली जायची नाही, एवढंच काय ते अधिवेशनांची माहिती देखील आयोगाला देत नव्हते, म्हणुन उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह गेले असा टोला खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
दोन दिवसीय या अधिवेशनात पहिल्या दिवशी संघटनात्मक विषय, राजकीय विषय आणि सरकारी कार्यशाळा या विषयी मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी नेत्यांना मार्गदर्शन तसेच सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या सभेने या अधिवेशनाची सांगता होणार आहे. या अधिवेशनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे मंत्री आमदार खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.