भाजपाच्या डिजिटल प्रचार रथांचे उद्घाटन
पुणे, दि. २८ : भारतीय जनता पक्षाच्या डिजिटल प्रचार रथांचे उद्घाटन रविवारी सायंकाळी एरंडवणे येथील शहर कार्यालयासमोर उत्साहात करण्यात आले. ‘पुण्याचा विकास करायचा तर ‘भाजपा’च पाहिजे’ असे घोषवाक्य या प्रचार रथांवर आहे.
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदींच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचार रथांचे उद्घाटन करण्यात आले.
भाजपच्या झेंड्याच्या रंगाप्रमाणे भगव्या आणि हिरव्या रंगाच्या या आकर्षक प्रचार रथांवर एलईडी स्क्रीन असून दृकश्राव्य माध्यमातून पक्षाने केलेल्या कामांची माहिती दिली जाणार आहे. हे प्रचार रथ शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरुन भाजपाने पुण्यासाठी केलेल्या कामांची माहिती आणि भावी विकासाची दिशा याबाबत प्रचार आणि प्रसार करणार आहेत.