सांगलीतून बंडखोरी करण्याच्या विचारात असलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील (Pratik Patil) यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र या भेटीमुळे महाविकास आघाडीच्या चिंतेत भर नक्कीच पडली आहे.
सांगली लोकसभेच्या जागेवरून आधीच महाविकास आघाडीमध्ये सार काही अलबेल नाही. त्यातच त्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. सांगलीतून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यावेळी मित्र पक्षांना विचारात घेतलं नसल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली. मात्र तरीही ठाकरेंनी पाटलांची उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळेच या ठिकाणचे काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे नाराज झाले असून बंडखोरी करण्याच्या विचारात आहेत. त्यातच आता त्यांचेच बंधू प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीत प्रकाश आंबेडकर आणि प्रतीक पाटील यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही बंधू विशाल पाटील यांना वंचित कडून उमेदवारी मिळावी या संदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रकाश आंबेडकर आणि प्रतीक पाटील यांच्या भेटीनंतर आंबेडकर यांनी लवकरच आपला निर्णय जाहीर करू असे वक्तव्य केले. त्याचबरोबर सध्या कुठलाही आग्रह केला नसून सल्ला सुद्धा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या भेटीत नेमके काय घडले या बाबतीतला सस्पेन्स अजूनही कायम आहे.
वंचित ने विशाल पाटलांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीची चांगलीच कोंडी होईल. आधीच या जागेवरून मविआ मध्ये संघर्ष सुरू आहे. या ठिकाणी ठाकरे गटाची ताकद नसल्याची टीका सुद्धा केली जात आहे. त्यात विशाल पाटलांना मानणारा बहुसंख्या वर्ग आहे. त्यामुळे त्यांची एन्ट्री झाल्यास सांगलीची निवडणूक चुरशीची होईल आणि मविआच्या मतांवर त्याचा परिणाम होईल.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Raj Thackeray : भाजपला पाठिंबा जाहीर करताच राज ठाकरेंना बसला ‘हा’ मोठा धक्का