परभणी महापौर (PARBHANI MAYOR) निवडीवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (SHIVSENA UBT) सय्यद इक्बाल यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EKNATH SHINDE) यांनी ‘मुस्लिम महापौर’ या मुद्द्यावरून ठाकरे गटावर टीका केली. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
परभणी(PARBHANI) महानगरपालिकेत झालेल्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल(SAYAD INKALAB) यांना 39 मते मिळाली. भाजपचे उमेदवार तिरुमला खिल्लारे यांनाही 39 मते मिळाल्याने चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर सय्यद इक्बाल यांची महापौर म्हणून निवड झाली. काँग्रेसचे गणेश देशमुख यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली.
या निकालानंतर एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) यांनी परभणीत ठाकरे गटाचा ‘खरा चेहरा’ समोर आल्याची टीका केली. मुस्लिम महापौर झाल्याचा उल्लेख करत त्यांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.यावर संजय राऊत(SANJAY RAUT) यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला. परभणीमध्ये (PARBHANI)भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक असल्याचा दावा करत, केवळ हिंदू-मुस्लिम भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या देशात आणि महाराष्ट्रात मराठी भाषिक मुस्लिम नागरिक आहेत. ते घुसखोर नाहीत. आमच्या पक्षातही अनेक वर्ष काम करणारे मुस्लिम पदाधिकारी आहेत. मग धर्माच्या आधारावर भेदभाव का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, “गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला,”असा घणाघात करत त्यांनी शिंदे गटावर टीका केली. परभणीचे नवे महापौर हे पक्षाचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना दोन्ही गटांतील वाद पुन्हा उफाळून आला आहे. धर्माच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.