नागपूर : मंगळवारी नवी दिल्लीत ‘रामनाथ गोयंका एक्सिलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड’ या पुरस्कारांचे वितरण नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी अनेक आठवणींना उजाळा दिला. देशात आणीबाणी लादली गेली नसती तर आपण राजकारणात आलो नसतो असं म्हणत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणीबाणीच्या काळातील संघर्षांच्या आठवणी यावेळी सांगितल्या.
काय म्हणाले नितीन गडकरी?
या पुरस्कार सोहळ्यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “देशात आणीबाणी लादली गेली नसती तर मी राजकारणात आलो नसतो. १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाली, तेव्हा मी दहावीची परीक्षा देणार होतो. त्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये माझ्या कुटुंबातील अनेक सदस्यांना ‘मिसा’खाली अटक करण्यात आली होती. त्यावेळी मी ठरवले होते की, मी आणीबाणीविरोधात लढणार. आणीबाणीच्या काळातील संघर्ष आम्ही कोणी आयुष्यभर विसरू शकणार नाही.”
यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी रामनाथ गोएंका यांच्या आणीबाणीविरोधातील संघर्षांचाही विशेष उल्लेख केला. “आणीबाणीविरोधात लढण्यासाठी रामनाथ गोएंका हे आमच्यासाठी लढण्याचे स्त्रोत होते. त्यांनी आणीबाणीच्या पहिल्या दिवसापासून तीव्र संघर्ष केला”, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना, महाराष्ट्रात प्रामुख्याने ‘लोकसत्ता’ने आणीबाणीविरोधात संघर्ष केल्याचेही गडकरी यांनी सांगितलं. “गोएंका यांच्याप्रमाणे आणीबाणीविरोधात लढणाऱ्या अनेक कुटुंबांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुखांसोबत रामनाथ गोएंका यांना भेटण्याची संधी मला मिळाली. त्यांचे विचार, कृती, त्यांचे व्यक्तिमत्व बघून मी खूप प्रभावित झालो होतो”, असेही ते म्हणाले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या