Maratha Aarkshan Manoj Jarange Patil: मुंबईमध्ये यशस्वी आंदोलन केल्यानंतर आता मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया त्वरित (Maratha Aarkshan Manoj Jarange Patil) सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यांनी सरकारला इशारा देत ही प्रक्रिया १७ सप्टेंबरपर्यंत सुरू करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीला तातडीने प्रतिसाद न मिळाल्यास पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, “१७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. त्या दिवसाच्या आत हैदराबादच्या गॅझेटियरमधील नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. आम्ही तुमचे कौतुक केले, पण आम्हाला पुन्हा असे वाटायला नको की तुम्ही फक्त आश्वासने देत आहात” असे म्हटले. १७ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू करण्याची त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.
जरांगे पाटील म्हणाले सरकारने मनुष्यबळ पुरवावे; तुम्ही आता ठरवलेच आहे, तर मनुष्यबळ द्या. गावोगावी स्थापन झालेल्या तीन सदस्यीय समित्यांना तातडीने कामाला लावा.” हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला किंवा हैदराबाद राज्याचा भाग असलेल्या भागातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याचे काम सुरू झाले पाहिजे. अन्यथा, मला पुन्हा नाइलाजाने मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
Pune: पुणे मेट्रोचा नवा उच्चांक दोन दिवसांत केला 6.9 लाख लोकांनी प्रवास
या संदर्भात बोलताना मनोज जरांगे यांनी राजकीय नेत्यांनाही सज्जड इशारा दिला. “वेळ आल्यास आमच्या गावात, आमच्या घरी राजकीय नेत्यांना येण्यास बंदी करावी लागेल, हे लक्षात ठेवा. तुमच्यावर कोणी दबाव आणेल, ‘जीआर कशाला काढला,’ ‘हे असे शब्द नको होते,’ असे कोणी म्हणेल… जर कोणाचे ऐकून आमची हेळसांड झाली, तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळे येऊ नयेत, याची काळजी सरकारने घ्यावी. ही धमकी नाही, तर विनंती आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, गरिबांच्या मुलांनी आणि मी मिळून हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर काढल्यानंतर अर्धा महाराष्ट्र गोंधळून गेला. काही अभ्यासकही गोंधळले, आणि जीआरमधील शब्द पाहून आमच्या विरोधातील काही लोक इतके अस्वस्थ झाले आहेत की त्यांना झोप येत नाहीये. “जर इतक्या मजबुतीने गरिबांच्या मुलांनी जीआर काढला असेल, तर मराठवाडा १०० टक्के आरक्षणात जाईल ,” असे जरांगे पाटील म्हणाले.
या संदर्भात त्यांनी मराठा समाजाला संयमाने वागण्याचा सल्ला दिला. “जुनी म्हण आहे की, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजयही पचवता आला पाहिजे. सध्या खूप आनंद झाला आहे, पण एकदा आपले सगळे हैदराबाद गॅझेटनुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा गॅझेटनुसार आरक्षणात जाऊ देत, मग आपण आणखी मोठा आनंद व्यक्त करू,” असे ते म्हणाले. काही लोक सध्या बिथरले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाने थोडे संयमाने घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शेवटी, जर गॅझेटियरची तातडीने अंमलबजावणी केली नाही, तर येत्या दसरा मेळाव्यात सरकारविरोधात भूमिका जाहीर करावी लागेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.