MANOJ JARANGE : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात (MANOJ JARANGE ) पुन्हा एकदा तापलेल्या आंदोलनाची धग आता आणखी वाढणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. “उद्यापासून मी पाणी पिणं बंद करणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाची दिशा आणखी तीव्र
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “सत्तर वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी झगडत आहे, पण अद्याप न्याय मिळालेला नाही. आमच्या लेकरांची ही वेदना आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरीब मराठा बांधव मुंबईत आले आहेत. त्यांना पाठबळ द्या. तुमच्या गाड्या मैदानात लावा, रेल्वेने आझाद मैदान गाठा, गाड्या सुरक्षित राहतील.”
त्यांनी आंदोलकांना स्पष्ट इशारा दिला की, कोणीही या आंदोलनाच्या नावाखाली पैशांची वसुली करू नये. “अन्नछत्रातून पैसे मागू नका. गरीबांचे रक्त शोषू नका. जो कोणी असाच प्रकार करेल, त्याचे नाव मी थेट माध्यमांसमोर घेईन. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कोणालाही पैसा द्यायचा नाही,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले.
सरकारवर रोखठोक टीका
सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका करत त्यांनी आंदोलन अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला. “मी काल-आज पाणी पिलं आहे. पण उद्यापासून पाणीसुद्धा बंद करणार आहे. सरकारला जर आम्ही जिवंत दिसत नसलो, तर ही लढाई शरीरानेच दाखवावी लागेल,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
पुढील टप्प्यात काय?
मनोज जरांगे पाटलांच्या या निर्णयामुळे आझाद मैदानावरील आंदोलनाची धग आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारकडून निर्णायक तोडगा निघतो का, की परिस्थिती अधिक गंभीर वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.