Manache Shlok Controversy: नुकताच प्रदर्शित झालेला अभिनेत्री-दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या (Manache Shlok Controversy) दिवसापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाच्या शीर्षकावरून काही हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. संत रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर व्यावसायिक चित्रपटासाठी करणे म्हणजे धार्मिक भावना दुखावण्यासारखे आणि ग्रंथाचा अपमान करण्यासारखे आहे, असा या कार्यकर्त्यांचा मुख्य आक्षेप आहे.
हा विरोध केवळ तोंडी नसून तो प्रत्यक्ष कृतीत उतरला. शुक्रवारी, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, पुण्यातील सिटी प्राईड, सिंहगड रोडवरील अभिरुची यासह काही थिएटर्समध्ये सुरू असलेले ‘मनाचे श्लोक’चे शो काही हिंदू कार्यकर्त्यांनी बंद पाडले. यात हिंदू कार्यकर्त्या उज्वला गौड यांचा सक्रिय सहभाग होता. गौड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ शोच बंद पाडले नाहीत, तर काही ठिकाणी चित्रपटाचे बॅनरही फाडून टाकले.
Dharashiv | आर्थिक नड भागवण्यासाठी शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री
या कृतीची मोठी किंमत उज्वला गौड यांना चुकवावी लागली आहे. शो बंद पाडणे आणि गोंधळ घालणे त्यांना आंगलट आले आहे. या घटनेनंतर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात उज्वला गौड यांच्यासह काही कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या वादाचे मुख्य कारण चित्रपटाचे नाव असले तरी, चित्रपटामध्ये संत रामदास स्वामींशी संबंधित काही दृश्ये वादग्रस्त असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. यापूर्वी, काही हिंदू संघटनांनी या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने चित्रपट प्रदर्शनास हिरवा कंदील दिला होता. तरीही, चित्रपटाला होणारा विरोध थांबलेला नाही.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. एका बाजूला धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तर दुसऱ्या बाजूला सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे झालेली कायदेशीर कारवाई, यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचा वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणावर आता पोलीस आणि न्यायालयीन पातळीवर काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.