महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला. 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील नव्या सरकाराचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचा पत्ता कट झाला. ज्यामुळे राज्यात नाराजी नाट्य सुरू आहे. आधी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली तर आता शिंदे गटाचे मोठे आमदारही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हे आमदार आहेत एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे तानाजी सावंत… तानाजी सावंत यांचे समर्थक मात्र जास्त नाराज असल्याचं दिसून येत आहे.
सावंतांसाठी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
नव्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांना आणि माझे मंत्र्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे अनेक नेते नाराज असल्याचं दिसून येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्या परांडा विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज असून त्यांच्यापेक्षाही नाराज त्यांचे समर्थक आहेत.
याचा अनुषंगाने परांडा मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळण्यासाठी सर्वच पदाधिकारी आग्रही होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांच्याकडे सावंतांच्या मंत्रिपदाची मागणी करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पुढच्या दोन दिवसात परंडातील शिवसैनिक एकनाथ शिंदेंकडेही मागणी करणार असून तरीदेखील मंत्रिपद न दिल्यास दोन दिवसात सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी राजीनामा देणार आहेत.
सावंत पुकारणार बंड ?
मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले तानाजी सावंत हे आजाराचं कारण देत अधिवेशन सोडून निघून गेले. सावंत हे तडकाफडकी नागपूरहून पुण्याला परतले. एवढेच नाही तर सावंत यांनी आपल्या समाज माध्यमांवरून चक्क शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह देखील हटवलं. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मी शिवसैनिक असं स्टेटस देखील त्यांनी ठेवलं. त्यामुळेच नाराज तानाजी सावंत हे बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.