कसबा पोटनिवडणुकीत रासनेंच्या तोंडचं पाणी पळवून पेढे वाटण्याची वेळ धंगेकरांची होती. त्यानंतर अवघ्या दीड वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी या उलट घडलं. धंगेकरांच्या तोंडचं पाणी पळवून पेढे वाटण्याची वेळ रासनेंवर आली. रासनेंच्या दृष्टीनं हा विजय मोठा त्यामुळं कसबावासीयांचं तोंड गोड करण्यासाठी पेढा देखील मोठा!
‘काकू, काका; हा घ्या कमळछाप पेढा!’
हेमंत रासनेंनी पोटनिवडणुकीतील पराभवाचं उत्त काढत कसबा विधानसभा निवडणुकीत धंगेकरांना पराभवाची धूळ चारली आणि भाजपच्या हातून निसटलेल्या कसब्यावर पुन्हा एकदा कब्जा केला. आता भला मोठा विजय मिळवल्यावर ‘पार्टी तो बनती है…’ ज्यांच्यामुळं आपल्याला विजयाची चव चाखायला मिळाली त्या कसबावासीयांचं तोंड गोड तर करायलाच हवं. ज्यांनी कसब्यात पुन्हा एकदा कमळ फुलवलं त्यांना ‘कमळछाप पेढा’ वाटायलाच हवा नाही का? मग काय? निवडणुकीत रासनेंना विजयी करण्यासाठी जी यंत्रणा दिवसरात्र राबराब राबली त्याच कार्यकर्त्यांच्या हातून हे कमळछाप पेढे कसब्यातल्या घराघरात वाटायला सुरूवात झाली. ‘आपले व आपल्या कुटुंबाचे मनःपूर्वक धन्यवाद! आपला आमदार, हेमंत रासने,’अशा मजकुरासह चौकोनी रॅपर बनवून त्यात ‘कमळछाप पेढा’ ठेवून, ‘काकू, हा पेढा, काका, घ्या की हो पेढा…’ असं म्हणत पेढेवाटप सुरूही झालं.
28 वर्षांनी कसबा काँग्रेसचा; दीड वर्षांनी पुन्हा भाजपचा!
कसबा विधानसभेचा इतिहास पाहिल्यास ज्या ज्या वेळी कसब्यात पोटनिवडणूक लागली त्या त्या वेळी भाजपनं कच खाल्ली. 1992 च्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट हरले, तर 2023 च्या पोटनिवडणुकीत रासने हरले. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार पोटनिवडणुकीत हरले तेच मोठ्या फरकानं विजयी झाले. 2023 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी 73194 इतकी मतं मिळवून भाजपचा हा बालेकिल्ला तब्बल 28 वर्षांनी काँग्रेसच्या नावावर केला होता. या निवडणुकीत हेमंत रासने यांना 62244 इतकी मतं पडली आणि धंगेकर 11040 इतक्या मताधिक्यानं निवडून आले. कसब्याचा हा पराभव एकटे रासनेच नव्हे, तर संपूर्ण भाजपच्या जिव्हारी लागला. रासने जिथं पडले, तिथूनच स्वतःला सावरत उठले आणि पुन्हा कामाला लागले… बघता बघता विधानसभा निवडणूक लागली आणि पोटनिवडणुकीत लागलेला निकाल बरोबर उलटा फिरला. 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंनी 90046 इतकी मतं मिळवून भाजपच्या हातून निसटलेला हा बालेकिल्ला पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आणून दिला. या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना 70623 इतकी मतं पडली आणि रासने 19423 इतक्या मताधिक्यानं निवडून आले. धंगेकरांनी पोटनिवडणुकीत मिळवलेल्या मताधिक्यापेक्षा रासनेंनी या निवडणुकीत 8383 इतक्या मतांचं जास्तीचं मताधिक्य मिळवलं.
रासने ठरले कसब्यात सर्वाधिक मतं मिळवणारे आमदार!
1972 पासून 2024 पर्यंत कसब्यात आतापर्यंत 12 विधानसभा निवडणुका आणि 02 पोटनिवडणुका झाल्या. या सर्व निवडणुकांमध्ये सर्वांत जास्त मतं 2024 मध्ये बनलेले आमदार हेमंत रासने यांना मिळाली आहेत. 90046 इतकी मतं घेणारे ते पहिलेच आमदार ठरले. या खालोखाल 2019 मध्ये आमदार झालेल्या मुक्ता टिळक यांना 75492 इतकी मतं मिळाली होती, तर त्या खालोखाल गिरीश बापट यांना 2014 मध्ये 73594 इतकी मतं मिळाली होती.
एकूणच काय, तर सर्वाधिक मतं, सर्वाधिक मताधिक्य आणि सर्वांत मोठा विजय मिळाल्यानंतर जल्लोष हा होणारच पण आता रासनेंना केवळ कमळछाप पेढ्यानं कसबावासीयांचं तोंड गोड करून भागणार नाही तर ‘कसब्याची पसंत, रासने हेमंत’ हे गाणं सत्यात उतरवायचं असेल, तर कसब्यात विकासही करून दाखवावा लागणार आहे. नाहीतर, 2029 ला विजयी आमदार पेढे वाटेल पण त्या पेढ्यावर कोणत्या पक्षाच्या चिन्हाचा ‘छाप’ असेल हे सांगता यायचं नाही.
Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी