नवी दिल्ली- काँग्रेसच्या जी-23 मधील प्रमुख बंडखोर असलेल्या कपिल सिब्बल यांनी पक्षाला रामराम केला आहे. ते आता राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांनी अधिकृतपणे समाजवादी पक्षाचं सदस्यत्व घेतलेलं नाहीये. मात्र, सपाच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेत दाखल होतील.
कपिल सिब्बल यांनी बुधवारी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी त्यांनी 16 मे रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. अलीकडच्या काळात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी कपिल सिब्बल यांची तोंडभरून स्तुती होती. तेव्हापासून कपिल सिब्बल यांना समाजवादी पक्ष राज्यसभेची उमेदवारी देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. कपिल सिब्बल यांनी आज लखनऊ येथून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, सपा खासदार राम गोपाल यादव उपस्थित होते.
उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 11 जागांवर निवडणूक होणार आहे. यापैकी भारतीय जनता पक्षाला सात आणि समाजवादी पक्षाला तीन जागा मिळू शकतात. दुसरीकडे 11 व्या जागेसाठी अडचणी निर्माण होणार असून, त्यासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे.