मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन बंड केले आणि सरकारला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. पक्षात दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आता अजित पवार समर्थक आमदारांच्या कोंडीला सुरुवात झाली आहे. एकीकडे अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सरू असताना दुसरीकडे आता अजित पवार गटाची विधान परिषदेत देखील कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
उपसभापतींकडे अर्ज
अजित पवार समर्थक विधान परिषदेच्या आमदारांवर कारवाईच्या मागणीसाठी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे 2 अर्ज आले आहेत. एक अर्ज हा प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांच्या नावे तर दुसरा अर्ज शरद पवार गटाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने आला आहे.
कोणावर कारवाई करण्याची मागणी?
जयंत पाटील यांनी केलेल्या अर्जात आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे यांच्या नावाचा उल्लेख तर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या अर्जात रामराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.