विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून आमदारांसाठी हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळत आहे..
12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठी च्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 12 उमेदवार रिंगणात असून यामध्ये भाजपाचे पाच शिंदेंच्या शिवसेनेचे दोन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन काँग्रेसचा एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक आणि शेतकरी कामगार पक्षाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता आहे. ही फाटाफूट रोखण्यासाठी आता सर्वच पक्षांनी खबरदारी घेतल्याचं पाहिला मिळत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी एक मुंबईत बैठक घेतली आणि त्यात विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी सुचना दिल्या. तसेच आगामी निवडणुकीत मतांची गोळाबेरीज देखील केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर, भाजपनेही आता आमदारांची हॉटेलमध्ये सोय केली आहे. तर, एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील आमदारांना मोठ्या हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती आहे. भाजप आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंटवर असणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांना वांद्र्यातील ताज लँड्स ऍण्ड हॉटेलमध्ये तर अजित पवार गटाकडून फोर सिझन्स किंवा ललीत हॉटेलची चाचपणी सुरू झाली आहे. यातील एका हॉटेलमध्ये अजित पवार गटाचे आमदार थांबतील अशी माहिती आहे. आयटीसी ग्रँडमध्ये ठाकरे गटातील आमदारांच्या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई पदवीधर आमदार अनिल परब निवडून आल्याने हे स्नेहभोजन अनिल परब यांनी आयोजित केल्याची माहिती मिळतेय. याशिवाय 12 तारखेला विधान परिषदेची निवडणूक असल्याने ठाकरे गटाचे आमदार ITC मध्ये उद्यापासून 12 जुलैपर्यत राहणार असल्याची माहिती समोर आली आहे