इजा ना बिजा; शिंदे दाम्पत्याच्या हातून विठ्ठलाची पूजा !

299 0

महाराष्ट्रात ज्यांनी सर्वांत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला त्यांनाच सर्वांत मोठं पद आणि सर्वांत मोठा मान मिळाला… मुख्यमंत्री हे सर्वोच्च पद आणि पंढरीच्या विठ्ठलाच्या पूजेचा सर्वोच्च मान ! त्यामुळं विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान उद्धव ठाकरे की फडणवीसांना मिळणार या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला पण हा पूर्णविराम देण्यापूर्वी काय काय अनपेक्षित घडलं हे वाचायलाच हवं…

………………………………
फ्लॅशबॅक… पहिला धक्का !

महाराष्ट्रात रंगलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडतानाच्या अखेरच्या क्षणी म्हणजे शपथविधी सोहळ्यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा काही ‘बॉम्ब’ फोडला की त्याच्या कानठळ्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांला बसल्या. ‘महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री… एकनाथ शिंदे होणार,’ असं फडणवीसांनी म्हटलं आणि भाजप कार्यकर्त्यांनी सोबत आणलेल्या फटाक्यांच्या वाती गळून पडल्या. भाजप शिंदे गटाला बाहेरून पाठिंबा देईल, हे वाक्य ऐकल्यानंतर तर सोबत आणलेले पेढे देखील कडू वाटू लागले…
………………………………
फ्लॅशबॅक… दुसरा धक्का !

आताच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे फिक्स पण एक नवं ट्विस्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार आणि भाजप सत्तेत सामील होणार ! हे ऐकून अगदीच गळपटून गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या शरीरात नवचैतन्य स्फुरलं आणि मग सोबत आणलेल्या फटाक्यांचा आवाजही झाला आणि पेढेही गोड झाले.
……………………..

आले विठ्ठलाच्या मना | तेथे काय बा कुणाचे चालेना ||

राज्यातील राजकीय परिस्थितीमुळं यंदा पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय पूजा कुणाच्या हातून घडणार यावर सर्वत्र चर्चा रंगत होत्या. सोशल मीडियावर तर या चर्चेला अक्षरशः ऊत आला होता. ठाकरे की फडणवीस यांच्या नावावरून बोली लागल्या होत्या. बाहेर पडत नसला तरी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट, मीम्सचा पाऊस पडत होता. शिवसैनिकांसह मविआप्रेमी म्हणायचे यंदाची पूजा उद्धव ठाकरेंच्याच हातून होणार तर भाजपप्रेमी म्हणायचे देवेंद्र फडणवीसांच्याच हातून होणार पण विठ्ठलाच्या मनात काही वेगळंच होतं… एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि यंदा पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याचा मान आपसूक शिंदेंना अर्थात शिंदे दाम्पत्याला लाभला. सरतेशेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं...’जे आले विठ्ठलाच्या मनी | ते ना होते कुणाच्या ध्यानीमनी ||’

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक
TOP NEWS मराठी

Share This News
error: Content is protected !!