निवडणूक आयोग शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांची बाजू ऐकून घेणार आहे. पक्षातील फूट मान्य करत निवडणूक आयोग आज दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेणार आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगासमोर सुमारे ९ हजार प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडूनही ६ ते ७ हजार प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. आज होणाऱ्या सुनावणीत आकड्यांचा विचार करता निर्णय आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास अजित पवार गटाकडून व्यक्त केला जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. शरद पवार गटाच्या बाजूनं निवडणूक आयोगासमोर अभिषेक मनु सिंघवी कायदेशीर बाजू मांडणार आहेत. तसंच वरिष्ठ नेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शपथ पत्रावर शरद पवार गटाकडून आक्षेप घेतला जाणार आहे. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आम्हाला योग्य तो न्याय मिळेल असा विश्वास अजित पवार गटाकडून व्यक्त करण्यात आलाय