धनंजय मुंडे यांचा राजीनामा अखेर घेण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर महाराष्ट्र भरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक नेते मंडळींनी आपली मतं मांडली आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील हे मुंडे यांच्यावर जोरदार बरसले. जरांगे पाटील यांनी मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच केवळ मंत्रिपदाचा राजीनामा नाही तर आमदारकीचा ही राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, “एवढी मोठी घटना होऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मग्रुरी जशीच्या तशी आहे. एवढी मोठी घटना झाल्यावर त्यांना पश्चात्ताप होणार नाही. असं करून हे सर्वांच्या नजरेतून उतरणार आहे. एक दिवस यांची लंका डुबणार. यांची मग्रुरी आणि मस्तीखोरामुळे यांची लंका पाण्यात डुबणार. हे लयाला जाणार आणि पाताळात जाणार आहे” असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आता सरकारवरील नामुष्की ओढवली, मी या स्वरूपाचा असा राजीनामा देतो. तसं बोलत नाही तो. आताही तीच मग्रुरीची भाषा आहे. माझं दुखतंय मी राजीनामा देतोय, उपचारासाठी. पदाचा आणि उपचाराचा काय संबंध? बरं झालं. मुख्यमंत्री आणि अजितदादांना कळालं माजोरडा आहे म्हणून. महाराष्ट्रातील मराठ्यांनाही कळायला हवं होतं. मराठ्यांनी सावध राहून त्यांना मोठं करू नये. मराठ्यांनी हातचं राखून काम केलं पाहिजे. या टोळीचा लोक नायनाट करतात.”
सर्व चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला. त्या आधी द्यायला हवा होता. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं आहे. राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलं. उशिरा का असेना पण अजितदादा आणि फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी लाथ घालून हाकललं. आपण मागणी केली. त्यांनी नैतिकता म्हणा आणि संस्कार म्हणा, आम्ही काल मागणी केली आज राजीनामा दिला. हे माज मस्ती करून आपलेच लोकं पाताळात घालणार. लोक त्यांना राहू देणार नाही. यांचा माजोरडापणा राहणार नाही. हे पैसेवाले झाल्यावर मस्तीखोर झाले. यांची अर्धी टोळी आत गेली. धनंजय मुंडे 302 मध्ये आहे म्हणजे आहे,” असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला आहे. आता धनंजय मुंडे यांच्याबाबत पुढे काय निर्णय घेतला जाणार. यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा कधी सुनावण्यात येणार ते पाहणं महत्वाचं असेल.