मुंबई : बॉलिवूडचा हिरो नंबर 1 अभिनेता गोविंदा (Govinda) हा पुन्हा एकदा राजकारणात नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. जवळपास 14 वर्षांच्या ब्रेक नंतर गोविंदाने राजकारणात पुनरामगन करायचे ठरवत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत राजकीय प्रवासाला पुन्हा सुरुवात केली आहे.
‘या’ मतदारसंघावर होते भाजपचे वर्चस्व
गोविंदाने काँग्रेसकडून 2004 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि त्याला मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातू उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचे वर्चस्व होते. त्यांनी 1989, 1991, 1996,1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी विरारपर्यंत होता. मुंबई आणि त्यावेळच्या ठाणे जिल्ह्यातील काही भागाचा समावेश होता मात्र 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर नालासोपारा, वसई-विरार हे भाग पालघर मतदारसंघाला जोडण्यात आले.मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी काँग्रेसकडून दिवस रात्र एक करण्यात आले होते.सलग पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकणारे आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्यासाठी ही निवडणूक सोप्पी असल्याची जोरदार चर्च होती. त्याच काळात काँग्रेसने सुपरस्टार गोविंदाला थेट निवडणुकीत उतरवले. विरार परिसरात नामांकित गोविंदाला उमेदवारी देण्याचा डाव काँग्रेसने खेळत या भागातील मते वळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.
अखेर 2004 ला मिळाले यश
2004 चा लोकसभा निवडणूक निकाल अतिशय धक्कादायक ठरला. गोविंदाला 5 लाख 59 हजार 763 मते मिळाली तर दुसरीकडे राम नाईक यांना 5 लाख 11 हजार 492 मते मिळत गोविंदाला मतदानाच्या एकूण 50 टक्के मते मिळाली होती. गोविंदाला वसई-विरार पट्ट्यातील नेते हितेंद्र ठाकूर यांच्या सोबत मैत्री असल्याचा फायदा झाला. वसई-विरार भागात गोविंदाला चांगली मते मिळाली होती.
कसा होता खासदारकीचा कार्यकाळ?
गोविंदाने आपल्या निवडणूक प्रचारात आपल्या अजेंड्यावर वाहतूक ,आरोग्य आणि शिक्षण असे प्रमुख विषय असतील असे म्हणत गोविंदाने पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या बोरिवली-विरार विभागात रेल्वेची चार मार्गिका करण्याचे श्रेय घेतले. गोविंदा खासदार असल्याच्या कालावधीत रेल्वेच्या मुद्यावर स्थानिक पातळीवर डीवायएफआय या डाव्या युवक संघटनेच्या नेतृत्त्वात मोठे सातत्याने आंदोलन केले होते. त्या आंदोलनाने मुळे बोरिवली-विरार मार्गातील रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग आला होता. संसद सदस्य म्हणून त्याच्या कार्यकाळात,लोकसभेचे अधिवेशन चालू असताना गोविंदा बरेच वेळा अनुपस्थित असल्यामुळे निष्क्रियतेबद्दल त्यांच्यावर कठोर टीका करण्यात आली होती. खासदार असताना गोविंदाने चित्रपटात काम करणे सुरू ठेवत 2007 मध्ये पार्टनर या चित्रपटात त्याने काम केले. राजकारण आणि बॉलिवूड करिअरमध्ये गोविंदाला सुवर्णमध्य साधता आला नाही. अखेर 2008 मध्ये त्याने राजकारणातून माघार घेतली. यानंतर आता 2024 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा एकदा राजकीय प्रवास सुरु करायचे ठरवले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.