मुंबई: शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर अखेर शिंदे गटात दाखल होणार असून यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळतात शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होणारे किर्तीकर हे तेरावे खासदार असणार आहेत.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गळाभेट घेत त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना नेते पदावरुन गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी @ShivSena pic.twitter.com/8Eqw68XIF1
— Saamana (@SaamanaOnline) November 11, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते. त्यानंतर, मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी रामदास कदम यांना जादू की झप्पी देत दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रवेशामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील शिवसेना नेते पदावरुन गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याचे पत्र प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे. त्यावर, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची सही आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ही हकालपट्टी करण्यात येत असल्याचं या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे.