मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लवकरच मी भेट घेणार आहे, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत काही दिवसांपुर्वी सांगितले होते.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्र सरकारमधील कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली. pic.twitter.com/YH3j5h3gne
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 9, 2022
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते, त्यानंतर लगेच दानवे यांनी देखीर राज भेटी संदर्भात भाष्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेर रावसाहेब दानवे यांनी आज मुबईत शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.
मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री @RajThackeray यांच्या बरोबर भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. pic.twitter.com/zvaof4RHck
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) April 9, 2022
विशेष म्हणजे मनसेचे निवडणूक चिन्ह हे रेल्वे इंजिन आहे, त्याच रेल्वे खात्याचे दानवे हे राज्यमंत्री असल्याने त्यांनी राज ठाकरे यांना रेल्वे ईंजिनाची प्रतिकृती भेट दिली. त्यांच्या या अनोख्या भेटीची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी गुडीपाडव्या निमित्त केलेल्या भाषणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्याने राज ठाकरेंच्या पक्षातूनच त्याला काही प्रमाणात विरोध झाला.
भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशी वाढवलेली जवळीक ही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत या दोन पक्षांमध्ये युती होणार की काय ? अशा चर्चा देखील रंगू लागल्या. विशेष म्हणजे ज्या रावसाहेब दानवे यांनी मनसेच्या परप्रांतीय मुद्यामुळे मनसेशी भाजपची युती शक्य नाही, असे स्पष्ट सांगितले होते, तेच दानवे आज राज ठाकरे यांच्या भेटीला गेले.