‘मी आणि उद्धव एकत्र येऊ नये, यासाठी अनेकांची फिल्डिंग’; ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

109 0

बाळासाहेब ठाकरे यांचा तालमीत वाढलेले आणि राजकारण सुटलेले राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकमेकांशी असलेलं राजकीय वैर हे जग जाहीर आहे. राज ठाकरे यांनी अनेकदा इतर पक्षांना पाठिंबा दिला. मात्र शिवसेनेबरोबर युती मात्र कधीही केली नाही. परंतु या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं महाराष्ट्रातील जनतेला वाटतं. यावरच बोलताना राज ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नयेत, यासाठी अनेक लोक फिल्डिंग लावत आहेत’, असं खळबळजनक विधान त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

राज ठाकरे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये, यासाठी अनेक लोक फिल्डिंग लावत आहेत. यात काही आमच्यातलेच आतले लोक आहेत तर काही बाहेरचेही आहेत. पण मी माझ्याकडून अलर्ट असतो. कोण काय बोलतंय हे मला कळतं, पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो.’

उद्धव ठाकरेंवर टीका

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर देखील टीका केली. ‘हिंदुत्ववादी शिवसेनेचा वर्सोव्याचा उमेदवार हारून खान आहे. तर दिंडोशीचे उमेदवार उर्दूतून पत्रकं काढतात. आघाडीमध्ये एकत्र असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर कधीही बाळासाहेब ठाकरेंचे नावही घेतले जात नसेल. काँग्रेसची मफलरं गळ्यात घालून उद्धव ठाकरे फिरणार असतील तर याचा अर्थ सगळ्याच गोष्टींचा व्यभिचार करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे’, अशी टिका वजा खंत राज ठाकरे यांनी या मुलाखतीत बोलून दाखवली.

Share This News
error: Content is protected !!