नवाब मलिक आमदार झाले तरी त्यांना…; भाजपाच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोठं विधान

223 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून प्रचारासाठी शेवटचे नऊ दिवस शिल्लक आहेत. सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठीची रणनीती आखली जात असताना आता भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्यानं माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानखुर्द शिवाजीनगरचे उमेदवार नवाब मलिक यांच्या संदर्भात एक मोठं विधान केलं आहे.

युती आणि आघाड्यांमध्ये निवडणुका लढत असताना कोणत्या पक्षांनी कोणता उमेदवार द्यावा अथवा कोणता उमेदवार देऊ नये या संदर्भात इतर पक्षांकडून केवळ मत व्यक्त केलं जाऊ शकतं मात्र अंतिमतः कोणाला उमेदवारी द्यायची हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे असं भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले विनोद तावडे?

एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना विनोद तावडे यांना नवाब मलिक यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता विनोद तावडे म्हणाले नवाब मलिक यांना अजित पवारांनी उमेदवारी देऊ नये असे मत भारतीय जनता पक्षांना व्यक्त केलं होतं. मात्र तरीही अजित पवारांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली त्यामुळे भारतीय जनता पक्ष नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी जाणार नाही. भविष्यात जर नवाब मलिक हे आमदार म्हणून निवडून आले आणि आमचं महायुतीचा सरकार आलं तर नवाब मलिक यांना मंत्रिमंडळामध्ये काम करू देणार नाही अशी भूमिका ही विनोद तावडे यांनी यावेळी स्पष्ट केली.

Share This News
error: Content is protected !!