संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड मधील अनेक गुंड आणि त्यांची गुन्हेगारी समोर येत आहे. बीड मधील वेगवेगळ्या गुंडांच्या टोळ्या आणि त्यांचे पराक्रम राज्यभर चर्चिले जात आहेत. त्यातच आता संतोष देशमुख यांचे बंधू असलेल्या धनंजय देशमुख यांचा साडू अर्थात दादा खिंडकर याची टोळी समोर आली आहे. हाच दादा खिंडकर वाल्मीक कराड पेक्षाही जास्त मोठा गुंड असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे हाच दादा खिंडकर नेमका आहे तरी कोण पाहूया.
दादा खिंडकर हा बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावचा रहिवासी असून तो याच गावचा सरपंच आहे. सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कुटुंबातील असलेल्या दादा खेडकरने गावची ग्रामपंचायत गेल्या दहा वर्षांपासून आपल्या ताब्यात ठेवली आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असून गेल्या दहा वर्षात राजकारणात चांगलाच सक्रिय आहे. मात्र इतक्या वर्षांपासून त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्याचे अनेक वाद समोर आले होते. त्याचबरोबर गावातील लहान-मोठे गावगुंड गोळा करून त्याने त्याचे एक टोळी तयार केली असून याच टोळीच्या माध्यमातून अनेक गुन्हे केले जात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. याव्यतिरिक्त तो अर्थातच धनंजय देशमुख यांच्या मेहुणीचा नवरा म्हणजेच देशमुख यांचा साडू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर न्याय मागण्यासाठी दादा खिंडकरही रस्त्यावर उतरला होता. त्याने अनेकदा माध्यमांशी बोलताना रडत रडत प्रतिक्रिया दिल्या आहेत. संतोष देशमुख यांना काहीही करून न्याय मिळायलाच हवा, अशी मागणी त्याने केली होती. पण आता त्याचेच अनेक पराक्रम समोर येत आहेत. त्याने बाभुळवाडी गावातील ओमकार सातपुते या तरुणाला चार जणांच्या टोळक्याकडून मारहाण होत आहे. ही टोळी दादा खिंडकरचीच आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या गाडीची तोडफोड करून घरावर हल्ला करतानाचा व्हिडिओ समोर आला. हा हल्ला देखील खिंडकर आणि त्याच्या टोळीनेच केला होता. त्यामुळे त्याच्यावर दरोडा, मारहाण, वाहन तोडफोडे सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बीडमधील अनेक गुंडांची प्रकरणं बाहेर येत असताना आता त्यांना आता दादा खिंडकर याचे देखील गुन्हे समोर आले आहेत. त्याचबरोबर तो आजच पोलिसांना शरण आला असून त्याला आता सात दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीतून आणखी कोण कोणती प्रकरण समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.