काल झालेल्या उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राज ठाकरे (raj thackeray) यांच्या युती नंतर आज ठाकरे बंधूंना मोठा धक्का. नाशिकमध्ये आज भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश झाला. विनायक पांडे , यतीन वाघ, दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. मात्र या पक्षप्रवेशाला नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता. मात्र विरोध असूनही पक्षप्रवेश झाल्यामुळे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (devyani farande) या भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षप्रवेशाबाबत फरांदे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे नाराजी व्यक्त केली होती. विनायक पांडे आणि यतीन वाघ यांना पक्षात प्रवेश देताना त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना त्या भावनिक झाल्या.
फरांदे म्हणाल्या, “माझा या पक्षप्रवेशाला विरोध नव्हता. मात्र त्या मतदारसंघात बबलू शेलार यांचा पक्षप्रवेश झाला होता. शेलार यांच्यासह स्थानिक आणि उर्वरित उमेदवारांचे पॅनल केले असते, तर ते शंभर टक्के निवडून आले असते, असे लोकप्रतिनिधी म्हणून माझे मत होते. बाहेरून आलेला एक उमेदवार आणि त्यासोबत स्थानिक तीन उमेदवार दिल्यास पक्ष निश्चितपणे जिंकू शकतो, हीच माझी भूमिका होती, असे फरांदे यांनी सांगितले.
आपली भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, “गेल्या चाळीस वर्षांत माझ्यावर अन्याय झाला असेल किंवा पक्षाने एखादी भूमिका घेतली असेल, तरी मी कधीही स्वतःसाठी भूमिका घेतली नाही. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे. मात्र सर्वांनीच स्वतःचा विचार केला, तर पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पाठबळ कोण देणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आज सकाळी सोशल मीडियावर पोस्ट टाकली, त्याचा एवढाच मुद्दा असल्याचे स्पष्ट केले .मी एक सामान्य कार्यकर्ती आहे. माझ्यासमोर जर कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल , तर ते मला योग्य वाटत नाही. माझी गिरीष महाजनावर नाराजी नाही. जे आज पक्षात आले , त्यांचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी स्वागत करते. मात्र आज जो निर्णय घेतला , तो मला आवडले नाही,अशा शब्दांत देवयानी फरांदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.