supriya sule on ncp merger

एकत्र येण्याची इच्छा कायम, पण विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या पूर्णविराम; सुप्रिया सुळे यांची भूमिका

538 0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी शिवनेरी येथे माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र सध्या या चर्चांना थोडा वेळ पूर्णविराम देण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले.

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील विलिनीकरणाबाबत विविध स्तरांवर बैठका झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात अनेक फेऱ्यांच्या बैठका झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. बैठकींची ठिकाणे, उपस्थित नेते आणि सीसीटीव्ही फुटेज यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. मात्र या सर्व चर्चांवर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया देताना सुळे यांनी “रामकृष्ण हरी” असे म्हणत अधिक भाष्य टाळले.

त्या म्हणाल्या, “आम्हाला एकत्र काम करण्याची इच्छा कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. पण सध्या या विषयावर अधिक बोलणे टाळूया. मोठ्यांविषयी विरोधात बोलणे आपल्याला आवडत नसल्याचे त्यांनी नमूद केले. “वास्तव माझ्या दादाला माहिती होते आणि मलाही माहिती आहे,” असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या भूमिकेबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, ते विविध मुद्दे मांडत असून त्यांच्यात अस्वस्थता दिसून येते. अनेकांना त्यांच्या सुरक्षिततेची चिंता वाटत असल्याने सरकारने त्यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. कुटुंबातील सदस्य आणि समर्थकांच्या मनात अनेक प्रश्न असून परिस्थिती अस्वस्थ करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

वैयक्तिक भावनांबाबत बोलताना सुळे यांनी आपल्या भावाच्या निधनाचा उल्लेख करत, “माझा भाऊ गेला आहे. त्याचे दु:ख आयुष्यभर राहील. आता काय खरं आणि काय खोटं, यापेक्षा संवाद महत्त्वाचा आहे. सीसीटीव्ही कशाला हवा? माणसं बोलण्यासाठी असतात,” असे भावनिक वक्तव्य केले.

याशिवाय विमान अपघाताच्या चौकशीबाबत संसदेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. पारदर्शक माहिती मिळेपर्यंत ही मागणी सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.