मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव, माजी राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते अखेर रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, ते 72 वर्षांचे होते.
सीताराम येचुरी हे भारताच्या डाव्या विचारप्रवाहातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित, कामगार व मागास वर्गाच्या हक्कांसाठीची अनेक आंदोलनं झाली. माकपचे नेते व खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला परखड शब्दांत जाब विचारला होता.
सीताराम येचुरी यांनी 1974 साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआयमध्ये प्रवेश केला. एका वर्षातच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यदेखील झाले. 1975 साली जेएनयूमध्ये असतानाच त्यांना आणीबाणीच्या काळात अटक झाली.
1977-78मध्ये ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते. प्रकाश करात यांच्यासह सीताराम येचुरी यांनी त्या काळात जेएनयूमधील डाव्या विचारप्रवाहाचं नेतृत्व केल्याचं मानलं जातं.